esakal | क्रीडा प्रशिक्षक झाले कामगार, बिगारी 
sakal

बोलून बातमी शोधा

क्रीडा प्रशिक्षक झाले कामगार, बिगारी 

औरंगाबाद शहरात बीपीएड, एमपीएड झालेले क्रीडा शिक्षक, प्रशिक्षक अनेक शाळांवर खेळांचे, फिटनेसचे प्रशिक्षण देतात. कित्येकांच्या ॲकडमी आहे. काही जण मैदानांवर विविध खेळांचे प्रशिक्षण देतात. मात्र लॉकडाऊन लागल्यानंतर त्यांच्या समस्यांना सुरवात झाली. आता ही त्यांची समस्या सुटली नाही. 

क्रीडा प्रशिक्षक झाले कामगार, बिगारी 

sakal_logo
By
शेखलाल शेख

औरंगाबाद: सर सहा महिने होत आले शाळा बंद आहे, आम्ही देत असलेले क्रीडा प्रशिक्षण बंद झालेय. लॉकडाऊनमध्ये जवळचे सगळे पैसे संपले. घरभाड्यासाठी पैसाच नसल्याने घर सोडावे लागले. कुटुंबाच्या दोन वेळच्या जेवणाची अडचण झालीय. त्यामुळे एक महिना माती काम केले. आता कंपनीत जाणार आहे. सर मी राष्ट्रीय खेळाडू आहे. बीपीएड, एमपीएड शिक्षण झालेय माझे. आता लोकांना उधार किती मागणार, हे हतबल वाक्य आहे क्रीडा प्रशिक्षण आणि क्रीडा शिक्षकांचे. 

औरंगाबाद शहरात बीपीएड, एमपीएड झालेले क्रीडा शिक्षक, प्रशिक्षक अनेक शाळांवर खेळांचे, फिटनेसचे प्रशिक्षण देतात. कित्येकांच्या ॲकडमी आहे. काही जण मैदानांवर विविध खेळांचे प्रशिक्षण देतात. मात्र लॉकडाऊन लागताच त्यांच्या समस्यांना सुरवात झाली. 

मी कंपनीत कामाला जाणार 

बास्केटबॉलचे राष्ट्रीय खेळाडू असलेले पंकज परदेशी म्हणाले की, माझे बीपीएड, एमपीएड झाले आहे. शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना बास्केटबॉल, फिटनेसचे प्रशिक्षण देतो. सिडको एन-३ येथील मैदानात माझ्याकडे अनेक मुले बॉस्केटबॉल प्रशिक्षणासाठी येत होती. शाळांमध्ये सुद्धा चांगले चालु होते. बेगमपुरा मध्ये आमचे छोटे घर आहे. त्यात आई-वडील, भाऊ त्यांचे दोन मुले आहे.

हेही वाचा- जेष्ठांना एसटी बसू द्यावे किंवा नाही 

घर छोटे असल्याने मी बीडबायपास रोडवर भाड्याच्या घरात राहण्यासाठी गेलो. चार पैसे हातात येत असल्याने चांगले चालु होते. मात्र १५ मार्चनंतर आमचा सगळ काही बंद झालं. भाड्याच्या घराचे कसेबसे आता पैसे भरले. जवळ पैसाच नसल्याने सगळं सामान काढून पुन्हा बेगमपुरामध्ये आई-वडिलांकडे आलोय. आता वाळुज येथे १ तारखेपासून कंपनीत कामाला जाणार आहे. 

एक महिना माती काम केले 

सॉफ्टबॉल, बेसबॉलचे राज्यस्तरीय खेळाडू, प्रशिक्षक असलेले संतोष अवचार म्हणाले की, लॉकडाऊन लागल्यापासून सगळ बंद झालं, माझ्या घरची परिस्थिती जेमतेम आहे. लग्न झालेले नसले तरी आई-वडीलांना कसे पैसे मागणार. मी क्रीडा शिक्षक, प्रशिक्षक आहे. शाळेवर जाऊन मुलांना सॉफ्टबॉल, बेसबॉलचे प्रशिक्षण देतो. हर्सुल येथे ॲकडमीपण सुरु केली होती.

मात्र आता शाळा, प्रशिक्षण, ॲकडमी सगळंच बंद झाले. मी विविध खेळांसाठी निवडलेल्या संघाचा चारवेळा व्यवस्थापक राहिलो आहे. मात्र लॉकडाऊन मध्ये माझ्या जवळ पैसाच नसल्याने मी एक महिना मातीकाम, बिगारी काम केले. मिळेल ते काम केले. माझ्याकडे क्रीडा प्रशिक्षण शिवाय उत्पन्नाचे कोणतेच साधन नाही. मुलांना प्रशिक्षण देत असताना मी स्वतः स्पर्धा परीक्षेची तयारी करतोय. मात्र आर्थिक-मानसिक परिस्थिती फार बिकट आहे. 

कंपनीत कामे केले आता मार्केटिंग काम करतोय 

बॉस्केटबॉलचे राष्ट्रीय खेळाडू असलेले विजय मालकर म्हणाले की, मी मुलांना बॉस्केटबॉलचे प्रशिक्षण देतो. माझ्या घरात तीन भाऊ आहे दोघांचे लग्न झाले. वडील आहे. लॉकडाऊन लागल्यापासून सगळेच आम्ही घरात बसून होतो. जवळ असलेले पैसे संपले. भाऊ सुद्धा घरातच असल्याने मी एका कंपनीत कामाला लागलो. एक महिना तेथे काम केले पण माझी तब्येत खराब झाल्याने तो जॉब सोडावा लागला. आता एक महिन्यांपासून मार्केटींगचे काम करत आहे.