दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसह शिक्षकांचाही दमछाक; अभ्यासक्रम पूर्ण करण्याचे आव्हान

संदीप लांडगे
Tuesday, 26 January 2021

यंदा शासनाने २५ टक्के अभ्यासक्रम कमी केला असला ७५ टक्के अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी शिक्षकांची तारेवरची कसरत सुरू आहे.

औरंगाबाद : जिल्ह्यात २३ नोव्हेंबरपासून; तर चार जानेवारीपासून शहरातील शाळा, कनिष्ठ महाविद्यालये सुरू झाली. मात्र, अजूनही विद्यार्थ्यांची उपस्थिती शंभर टक्के नाही. ४०-५० टक्केच विद्यार्थी शाळेत येत आहेत. दरम्यान, एप्रिल-मे महिन्यात दहावी, बारावीच्या परीक्षा घेणार असल्याचे शासनाने स्पष्ट केले. त्यासाठी २५ टक्के अभ्यासक्रम कमी केला असला तरी, तीन महिन्यांत ७५ टक्के अभ्यासक्रम पूर्ण करण्याचे आव्हान विद्यार्थी, शिक्षकांपुढे आहे. त्यामुळे त्यांची दमछाक होत आहे.

यंदा शासनाने २५ टक्के अभ्यासक्रम कमी केला असला ७५ टक्के अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी शिक्षकांची तारेवरची कसरत सुरू आहे. रिव्हीजन, प्रॅक्टिकलचा प्रश्‍न अनुत्तरितच आहे. कोरोनाच्या काळात अनेक विद्यार्थी शाळा, महाविद्यालयांच्या संपर्कात नव्हते. काहींनी या तीन महिन्यांत सहा ते सात विषयांचा अभ्यास करणे अशक्य असल्यामुळे परीक्षा अर्जच भरणे टाळले आहे. २०२१ सत्रातील परीक्षेचा अभ्यासक्रम व प्रात्यक्षिकाबद्दल दिशानिर्देश स्पष्ट नाही. वेळापत्रक नाही. परीक्षा केंद्रावरील व्यवस्था व नियोजन अस्पष्ट आहे. जानेवारी महिना संपत आला तरी अभ्यासक्रमाबाबत अद्याप संभ्रम आहे.

 

आम्ही अभ्यासक्रम पूर्ण करून घेण्याच्या सूचना शिक्षकांना दिल्या. मात्र, तीनच महिने राहिल्यामुळे विद्यार्थी परीक्षेला बसण्यास तयार होत नाहीत. तीन महिन्यांत सहा ते सात विषयांचा अभ्यास करणे झेपणार नसल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. मंडळाने २५ टक्के अभ्यासक्रम कमी केला असला तरी संपूर्ण धडे अभ्यासक्रमाचेच आहेत. अजूनही उपस्थिती फक्त ५० टक्केच आहे. ऑनलाइन, ऑफलाइन दोन्ही वर्ग शिकवणे शक्य होत नाही. विद्यार्थीही गोंधळलेल्या स्थितीत आहेत.
- विजय द्वारकुंडे, मुख्याध्यापक

एप्रिलमध्ये परीक्षा होणार असल्याने अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी आहे. या तीन महिन्यांत आम्ही अभ्यासक्रम पूर्ण करून घेऊ. परीक्षेला समोरे जायला तयार आहोत. त्यासाठी विद्यार्थी, पालकांनी साथ द्यावी. विद्यार्थ्यांनी नियमीत वर्गात यावे. शासनाने अभ्यासक्रमाबाबतचा संभ्रम दूर करावा.
- प्रा. मनोज पाटील

ऑक्टोबर महिन्यांपर्यंत शाळांनी कोणताही विषय गांभीर्याने घेतला नाही. ग्रामीण भागात ऑनलाइन शिक्षण अशक्य होते. २३ नोव्हेंबरला शाळा सुरू झाल्या. ७५ टक्के अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी प्रत्येक विषयाला शिक्षक आहे. मात्र, विद्यार्थ्याला एकट्यालाच सहा ते सात विषयांचा तीन महिन्यांत अभ्यास करून परीक्षा द्यायची आहे. सराव करण्यासाठी वेळच मिळणार नसल्याने परीक्षेची तयारी होणार कशी? परिस्थितीचे आकलन करून किमान ५० टक्के अभ्यासक्रम कमी करावा, त्याबाबत विद्यार्थ्यांना सूचना व मार्गदर्शन करण्यात यावे.
- सुनील पठारे, ग्रामीण विद्यार्थी

 

 

Edited - Ganesh Pitekar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: SSC, HSC Students With Teachers Challenge Of Completing Syllabus Aurangabad News