उद्योग विभाग टेस्ला कंपनीच्या संपर्कात, शेंद्रा डीएमआयसीसाठी १६० कोटींच्या गुंतवणुकीचा करार: उद्योगमंत्री सुभाष देसाई

मधुकर कांबळे
Tuesday, 26 January 2021

महाराष्ट्रात उद्योग विकासासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली जे तीन करार केले आहेत.

औरंगाबाद : टेस्ला कंपनीने भारतात गुंतवणुकीची इच्छा दर्शवल्यानंतरपासून राज्याचा उद्योग विभागाकडून या कंपनीचे संचालक मंडळाच्या संपर्कात आहे. कंपनीचे संचालक एलॉन मस्क यांच्यासोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संपर्क साधला आहे. या चर्चेत त्यांनी महाराष्ट्रासाठी सकारात्मकता दर्शविली आहे. त्यामुळे ही कंपनी अजूनही कर्नाटकात गेलेली नसून बंगलोरमध्ये त्यांनी केवळ गाड्या विक्रीचे शोरूम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती उद्योग तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी सोमवारी (ता.२५) दिली.

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर उद्योगमंत्री श्री. देसाई यांनी माध्यम प्रतिनिधींसोबत संवाद साधला. ते म्हणाले, ‘‘महाराष्ट्रात उद्योग विकासासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली जे तीन करार केले आहेत. त्यात मराठवाड्याचाही समावेश आहे. त्याशिवाय शेंद्रा डीएमआयसीसाठी नुकतेच १६० कोटींच्या गुंतवणुकीचाही करार करण्यात आला आहे. महाराष्ट्रासह मराठवाड्याच्या उद्योग विकासावर राज्य शासन भर देत आहे. चारचाकी गाड्यांची निर्मिती करणाऱ्या टेस्ला कंपनीने भारतात गुंतवणुकीचा निर्णय घेतल्यानंतर या कंपनीच्या संचालक मंडळाशी राज्याचा उद्योग विभाग संपर्कात आहे.

कंपनीचे संचालक एलॉन मस्क यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधण्यात आला आहे. यात त्यांनी भारतातील प्राधान्य क्रमामध्ये महाराष्ट्राला पहिली पसंती दर्शविली आहे. कुठलेही उद्योजक गुंतवणुकीची घोषणा केल्याबरोबर कंपनी उभारण्यासाठी नोंदणी करीत नाहीत. त्यात विदेशी कंपन्या तर उद्योग उभारण्यापूर्वी अनेक वर्षे चाचपणी करून तेथील पायाभूत सुविधांची पाहणी करतात. त्यानंतरच गुंतवणुकीचा निर्णय घेतात.

टेस्ला देखील सध्या तेच करीत आहे. उद्योग उभारणीसाठी आवश्यक पायाभूत सुविधा इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रात अधिकप्रमाणात चांगल्या आहेत. त्यामुळे आम्ही महाराष्ट्र राज्याचा विचार करीत आहोत, असेही मस्क यांनी स्पष्ट केले’’, अशी देसाई यांनी दिली; तसेच महाराष्ट्राऐवजी कर्नाटकात गुंतवणूक करणार असल्याबाबतची चर्चादेखील चुकीची असून, बंगलोरमध्ये कंपनी केवळ विदेशात तयार झालेल्या त्यांच्या गाड्या विक्रीसाठी शोरूम सुरू करीत आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

 

Edited - Ganesh Pitekar

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Subhash Desai Said State State Being Contact With Tesla Aurangabad News