सामुदायिक प्रार्थनेला गर्दी करू नका सांगणाऱ्या पोलिसांवर दगडफेक

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 28 April 2020

  • पैठण तालुक्यात बिडकीनला जमावाची दगडफेक
  • फौजदारासह तीन पोलिस जखमी
  • गर्दी न करण्याबाबत समजावून सांगताना वाद
  • पंधरा जणांना घेतले पोलिसांनी ताब्यात 

औरंगाबाद : रमजानच्या काळात धार्मिक स्थळी एकत्र जमून प्रार्थना करू नका, हे सांगण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृती केली जात आहे. सामाजिक संघटनांपासून प्रशासनापर्यंत सर्वच पातळीवरून संदेश दिले जात आहेत. मात्र, तरीही एकत्र येऊन प्रार्थना करणाऱ्यांना समजावण्यास गेलेल्या पोलिसांवरच दगडफेक केल्याची घटना पैठण तालुक्यात उघडकीस आली आहे. 

कोरोनाच्या संकटामुळे सर्वत्र लॉकडाउन सुरू आहे. पण बिडकीन-औरंगाबाद रस्त्यावरील आमिरनगर येथील एका प्रार्थनास्थळी सामुदायिक प्रार्थना सुरू असल्याची माहिती बिडकीनच्या पोलिसांना मिळाली. त्यावरून फौजदार राहुल पाटील हे सहायक फौजदार बाबासाहेब दिलवाले, पोलिस कर्मचारी श्री. सोनवणे यांच्यासह तेथे गेले. गर्दी न जमविण्याबाबत समजावून सांगत असताना बाचाबाची होऊन जमावाने पोलिसांवर दगडफेक केली. 

मुख्यमंत्र्यांनी मेडिकल सुरू ठेवले, पण हा पठ्ठ्या काय विकतोय पाहा

त्यात फौजदार राहुल पाटील यांच्यासह तिघेही पोलिस कर्मचारी जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना सोमवारी (ता. २७) रात्री साडेसातच्या सुमारास बिडकीन (ता. पैठण) येथे घडली. यावेळी बिडकीन परिसरात मोठा तणाव निर्माण झाला होता. 

पंधरा जण ताब्यात

घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी गोरख भामरे, सहायक पोलिस निरीक्षक राजेंद्र बनसोडे यांनी घटनास्थळी भेट दिली. याप्रकरणी पंधरा संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

संताप येईल तुम्हाला ही बातमी वाचाल तर...

दरम्यान, मोक्षदा पाटील यांनी या वसाहतीतील काही नागरिकांना पोलिस ठाण्यात बोलावून घटनेची माहिती घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक राजेंद्र बनसोडे हे करीत आहेत. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Stone Pelting On Police In Bidkin Corona Lockdown Ramjan Aurangabad