#Youth_Inspiration : लग्नानंतर स्पर्धा परीक्षेची तयारी, झाल्या तहसीलदार

Dr. Shital Rajput
Dr. Shital Rajput

औरंगाबाद - कठोर परिश्रम घेण्याची तयारी, चिकाटी आणि अभ्यासाचे योग्य नियोजन करायला हवे. तसे केल्यास क्षेत्र कुठलेही असो, यश मिळतेच. त्यासाठी प्रयत्न करायला सुरवात करायला हवी, हा आदर्श समोर ठेवला आहे तो डॉ. शीतल राजपूत यांनी. लग्नानंतर त्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी केली. आज त्या तहसीलदार आहेत.

डॉ. राजपूत या सध्या जिल्हाधिकारी कार्यालयात अकृषिक विभागात तहसीलदार आहेत. जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथे पहिली ते पाचवीपर्यंतचे शिक्षण झाले. त्यानंतर नवोदय विद्यालयात शिक्षण झाले. वडील रेडिओ, टीव्ही दुरुस्ती करतात. आई, चार बहिणी आणि एक भाऊ असे माहेरचे कुटुंब.

त्यांनी पुणे येथील टिळक आयुर्वेदमधून 2006 मध्ये बीएएमएस केले; मात्र तिथे कधीच ज्ञानप्रबोधिनी पाहिली नाही, यूपीएससी, एमपीएससीची तयारी करावी, असे कधी वाटलेच नाही, असे त्या सांगतात. आपल्या यशाबद्दल सांगताना त्या म्हणाल्या, डॉक्‍टर म्हणून चार वर्षे प्रॅक्‍टिस सुरू होती. मे 2011 मध्ये लग्न झाले. फेब्रुवारी 2012 मध्ये औरंगाबादला आले.

माझ्या पतीनेच स्पर्धा परीक्षेची तयारी करायचा विचार डोक्‍यात घातला. तयारी सुरू केली. पहिली पोस्टिंग एसटीआय झाले. त्यानंतर राज्यसेवा दिली आणि 2014 मध्ये तहसीलदार झाले. डॉक्‍टर म्हणून रुग्णसेवेमध्ये रमलेले असतानाच ट्रॅक बदलला. तहसीलदार होईपर्यंत कधीच तहसीलदार पाहिले नव्हते. पतीच्या इच्छेमुळे ट्रॅक बदलला आणि अधिकारी झाले.

वाटले नव्हते अधिकारी होईल म्हणून

लहानपणी तर मी अधिकारी होईल, असे कधी वाटलेही नव्हते; मात्र 'नवोदय'ची विद्यार्थिनी असल्यामुळे वाचन होतेच; पण स्पर्धा परीक्षेची तयारी खूप उशिरा केली; पण अतिशय कमी वेळेत या पदावर पोचले. ज्या मुला-मुलींना अधिकारी व्हायचे असते, त्यांनी सुरवातीपासून मन लावून तयारी केल्यास यश हमखास मिळतेच. कष्टाशिवाय या जगात काहीही मिळत नाही.

डॉक्‍टर म्हणून काम करीत असताना तयारी केली आणि यश मिळाले. जर सुरवातीपासूनच आपले ध्येय ठरलेले असेल तर आपण त्यादृष्टीने वाचन करीत असतो. तशी तयारी करीत असतो, हे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावे, असा सल्ला त्या देतात.  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com