#Youth_Inspiration : हॉस्पिटलमध्ये रात्रीपाळी करणारा बनला डॉक्‍टर 

dr shivaji pole aurangabad
dr shivaji pole aurangabad

औरंगाबाद - त्याचा जन्म शेतकरी कुटुंबातील. केवळ दोन एकर जमिनीवरच उदरनिर्वाह. मातीत राबूनही निर्सगाच्या लहरीपणाने श्रमाची मातीच होत होती. त्यामुळे संसाराचा गाडा हाकताना आई-वडिलांची दमछाक होत असे. आपल्या नशिबी जे आले ते आपल्या मुलाच्या नशिबी येऊ नये म्हणून आई-वडिलांनी त्याला माध्यमिक शिक्षणासाठी जिल्हा ठिकाणी पाठवले. त्यानेही तिथे एका हॉस्पिटलमध्ये रात्रपाळीत मिळेल ते काम करून दहावी उत्तीर्ण केली. आज तोच तरुण एमबीबीएस, एमडी रेडिऑलॉजी ते इण्डोव्हॅस्क्‍युलर सर्जन झाला.

मराठवाड्यातील पहिला रक्तवाहिन्यांचा तज्ज्ञ म्हणून त्याची ओळखी आहे. त्याच्या या यशाने मातीत राबणाऱ्या आई-वडिलांची अस्मिता जणू आभाळभर गेली. ही यशोगाथा आहे ती डॉ. शिवाजी पोले यांची. शिवाजी यांचे मूळ गाव बरड शेवाळा (ता. हातगाव, जि. नांदेड). त्यांचे प्राथमिक शिक्षणही याच गावातील जिल्हा परिषद शाळेत झाले. घरची परिस्थिती जेमतेम; पण शिक्षणाचे महत्त्व ओळखून शिवाजी यांच्या आई-वडिलांनी त्यांना पुढील शिक्षणासाठी नांदेडला वसतिगृहात ठेवले. तिथे एका हॉस्पिटलमध्ये शिवाजी रात्रीपाळीचे काम करत होते.

त्यातून शिक्षणाचा खर्च कसाबसा भागला. दहावीत चांगले मार्क मिळाले; मात्र कोणत्या शाखेत जावे कळेना. शिक्षकांच्या सल्ल्याने विज्ञान शाखा घेतली. बारावीत चांगले मार्क मिळाले. अभियांत्रिकीच्या शाखेत प्रवेश मिळत होता; पण शिक्षक आणि ओळखीतल्या डॉक्‍टरांनी सल्ला दिला.

त्यानुसार एमबीबीएस करण्याचे ठरवले. एन्ट्रान्स परीक्षेत चांगले मार्क्‍स मिळाले. मुंबईत चांगले कॉलेज मिळत होते; पण घरापासून लांब नको म्हणून कुटुंबीयांनी कसेबसे औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शिकायला पाठवले. ते दिवस काटकसरीत काढले. एमबीबीएसनंतर मेडिकल ऑफिसर म्हणून नाशिकला काम केले. त्यानंतर पीजीत पहिल्या प्रयत्नांत यश मिळवले. घाटीतच एमडी रेडिओलॉजी पूर्ण केले. आवड आणि शिकण्याच्या इच्छेने मुंबईतून इण्डो व्हॅस्क्‍युलर सर्जरीचे शिक्षण मुंबईतून घेतले. हे शिक्षण घेणारा मराठवाड्यातील पहिला सर्जन आहेत. 

केल्या दहा हजार शस्त्रक्रिया 
मुंबईत चागल्या पगारी नोकरीची संधी असताना मराठवाड्यातील तळागाळातील लोकांसाठी काम करण्याची इच्छा होती. 2011 पासून एमजीएममध्ये ज्वाईन झाला. त्यांनी आतापर्यंत दहा हजारांपर्यंत बीन टाक्‍याच्या रक्तवाहिन्यांच्या सर्जरी केल्या. नवनवे तंत्रज्ञान आत्मसात केल्याचा आनंद असल्याचे डॉ. शिवाजी पोळे यांनी "सकाळ'ला सांगताना आई-वडिलांचे परिश्रम आणि या वाटचालीतील मदत करणाऱ्यांच्या ऋण व्यक्त करायला विसरले नाहीत हे विशेष. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com