औरंगाबाद : या गावातील शेतकरी घेतात एका एकरात ५० लाखांचे उत्पन्न

शेख मुनाफ
बुधवार, 1 जुलै 2020

  • आडूळच्या मोसंबी रोपांची परराज्यात झेप 
  • पारंपरिक पीकाला फाट देत शेतकऱ्यांची लाखोंची उलाढाल 

आडूळ (जि. औरंगाबाद) - यंदा सुरवातीपासूनच सर्वत्र समाधानकारक पाऊस झाला. त्यामुळे येथील मोसंबी रोपवाटिकेवरील विविध जातीच्या मोसंबी रोपांच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. येथील मोसंबी रोपे राज्यात प्रसिद्ध असल्याने रोपे खरेदीसाठी राज्यातील विविध जिल्ह्यांसह परराज्यातील शेतकरी खरेदीसाठी येथे येत आहेत. दरम्यान, तीस गुंठे क्षेत्रात
एक लाख रोपे तयार होतात. एक कलम चार ते सहा रुपये प्रमाणे विक्री होते. त्या प्रमाणे एक एकर क्षेत्रात पन्नास ते साठ लाखांचे उत्पन्न शेतकऱ्याला मिळते. त्यामुळे येथील बहुतांश शेतकरी मोसंबी कलमे तयार करून त्याची विक्री करतात. मात्र, रोपांची लागवत करणे, त्यांची निगा राखणे, उन्हाळ्यात त्यांना पाणी देणे यावर मोठा खर्च होतो. 

कमी क्षेत्रात जास्त उत्पन्न मिळत असल्याने अनेक वर्षांपासून येथील बहुतांश शेतकरी मोसंबीच्या विविध जातीची कलमे तयार करून त्याची विक्री करतात. येथे ३२ परवानाधारक व शंभरहून अधिक शेतकरी खासगी रोपवाटिकेच्या माध्यमातून मोसंबीच्या विविध जातीचे रोपे तयार करतात. ही रोपे जंबेरीच्या खुंटावरती कलमे बांधून केली जाते. ही कलमे विक्रीला
तयार होण्यासाठी दोन वर्षांचा कालावधी लागतो.

चिनी ऍपला पर्याय भारतीय अप्लिकेशन्स; रोपोसो, मित्रो आणि चिंगारीला पसंती

पहिल्या वर्षी जंबेरीचे बियाणे टाकून जंबेरी झाडे तयार केली जाते. त्यानंतर दुसऱ्या वर्षीच्या सुरवातीला जंबेरी व रंगपूर झाडाच्या खुंटावर न्यू शेलार, रंगपूर, कॉटन गोल्ड, दगडी गावरान, सतगुडी, फुले, लिंबू व गळलिंबूची डोळे बांधून कलमे तयार केली जातात. जंबेरी खुंटावरती बांधलेल्या रोपांना साडेचार ते पाच हजार रुपये तर रंगपूर खुंटावरती बांधलेल्या रोपांना साडेपाच ते सहा हजार रुपये प्रति शेकडा (शंभर) असा भाव मिळतो. 

Tiktok वर होतं मोदी सरकारचं अकाउंट; बंदीनंतर काय झालं?

 

आमच्या रोपवाटिकेत यंदा पन्नास हजार मोसंबी रोपे विक्रीसाठी तयार झाली. यातील अर्ध्याच्यावर रोपे विक्री झाली आहेत. 
- रामराव वाघ, श्रीराम नर्सरी, आडूळ 

माझ्याकडे चार गुंठे क्षेत्रात २० हजार कलमे आहेत. त्यातील अर्धी अगोदरच बूक झालेली आहेत. आता उर्वरित रोपांची विक्री सुरू आहे. 
- गणेश कोल्हे, खासगी रोपवाटिका 
 

दहा गुंठे क्षेत्रात रंगपूर, न्यू शेलार जातीची कलमे तयार केली आहे. अर्ध्याधिक रोपांची विक्री झाली आहे. मोठ्या प्रमाणात रोपांना मागणी आहे. 
- शेख अब्बास, खासगी रोपवाटिका 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Success story of farmer in Adul Dist Aurangabad