दर कोस दर मुक्काम करत ऊसतोड कामगार निघाले कारखान्याच्या दिशेने

Sugarcane Cutting Labourers
Sugarcane Cutting Labourers

पाचोड (जि.औरंगाबाद) : जुलै-ऑगस्टमध्ये कारखान्याला ऊसतोड कामगार पुरविण्याचा करार करून ते पूर्ण करण्यासाठी प्रत्येक टोळी मुकादम  प्रयत्नशील असून जाण्याचा करार करणारे कामगार हंगाम सुरू झाल्याने आता कारखान्याच्या दिशेने  दर कोस दर मुक्काम करीत जात आहेत. त्यामुळे गावाचे गावपण हरवत चालले आहे. काही कामगार दसरा-दिवाळीला परजिल्हयात ऊसतोडीसाठी जाण्याचा करार करून आगाऊ उचल घेतल्यानंतरही  कारखान्याची वाट धरण्यास टाळाटाळ करत असल्याने मुकादमाच्या नाकीनऊ येत आहे; तर काही जण गावांकडे पर्यायच नसल्याने दर कोस- दर- मुक्काम करीत कारखान्याच्या दिशेने जात असल्याचे चित्र पाचोड (ता.पैठण) परिसरासह सर्वत्र पाहावयास मिळत आहे.


सर्वत्र साखर कारखान्यांच्या गळीत हंगामास सुरवात झाली असून जूलै-ऑगस्ट महिन्यात कारखान्यांनी मुकादमाद्वारे ऊसतोड कामगारांच्या टोळीप्रमुखांना आगाऊ रकमाचे वाटप केले. ओल्या दुष्काळी स्थितीमुळे यंदा ऊसतोडीला जाणाऱ्याची संख्या दुप्पट झाली. परतीच्या पावसाने जेरीस आणल्याने हातावर पोट असणाऱ्याचा कोंडमारा झाला. तूर्तास गावाकडे हाताला काम व माणसासह जनावरांना चारा वैरणीची धास्ती लागल्याने पाच-सहा महिने कारखान्याच्या फडावर गुजराणीच्या अपेक्षेने जाणारे सर्वच जण पसंती देत आहे. दरवर्षी परिसरातुन शेतमजूरासह बागायतदार कारखान्याशी करार करुन ऊसतोडीला जात असत. तर अनेक वर्षांपासून कारखान्याशी करार करून ऊसतोड करून प्रामाणिकता जोपासणारे यावर्षी उचल करूनही कामावर जाण्यासाठी तोंड लपवित असल्याचे चित्र पाहावयास मिळते.

त्यामुळे बहुतांश मुकादम पोलिसांना मजूरवर्गास कामावर पाठविण्यासाठी सहकार्य करण्याचे साकडे घालत आहेत; तर काही जण टोळीप्रमुखाच्या घरासमोरच ठिय्या मांडून बसल्याने टोळीप्रमुख भूमिगत झाल्याचे पाहावयास मिळते. काही मजूरांनी मुकादम, टोळी प्रमुखास चकवा देऊन गाडी येण्यापूर्वीच परगावी पोबारा करत असल्याचेही दिसते. दरवर्षीच्या तुलनेत यंदा  रांजणगाव (दांडगा), थेरगाव, दाभरुळ,  वडजी, देवगाव, थापटी, हर्षी, मुरमा, हिरडपूरी, रजापूर, कोळी बोडखा आदी गावांतील शेतकरी, बागायतदार, कामगारवर्ग कारखान्याची मोठ्या संख्येने वाट धरत आहेत. त्यामुळे गाव रिकामे होऊन गावाचे गावपण हरवत चालल्याचे चित्र पाहावयास मिळते. ऊसतोडीला निघताना कामगार सोबतीला भांडीकुंडी, खोपटाचे साहित्य, बैलगाडी, शेळ्या, चिमुरडी पोरं आदी सोबत नेत असून मुकादमाकडून केलेली उचल फेडण्यासाठी त्यांना पाच- सहा महिने ढोर मेहनत करावी लागते.

कामावर जाण्यापूर्वी ज्यांचे घरी वयोवृद्ध नाहीत, ते घरमालक कडी कोयंडा, कुलूप लावून त्यावर फडके बांधून शेणाचा लेप देतात. सहा महिन्यानंतर ते मोठ्या उमेदीने गावाकडे परततात. ऊसतोडीला गेलेल्या कामगारांचे सणवार उसाच्या फडावरच साजरे होतात. या काळात त्यांच्या मुलांचे शिक्षण वायाला जाऊन शिक्षणाची वाताहात होते.  हे चित्र पाहुन कामगार त्यांच्या मुलांना "शिकुन सवरून करशील काय ...... कामासाठी उभा ऱ्हाय....!" चा बाळकडू पाजत असल्याचे दिसते. यंदा आगाऊ उचल देण्यापूर्वी मुकादमांनी टोळीप्रमुखाकडुन दोन साक्षीदार, छायाचित्रे, शंभर रूपयाच्या स्टॅम्प पेपरवर बंधपत्र आदी अटींची पूर्तता करुन घेतली आहे.


यासंबधी शेख बशीरभाई (मुकादम)म्हणाले, कारखान्याकडून अॅडव्हान्स घेण्यासाठी मजूराची दोन महिन्यांपासून धावपळ सुरु आहे. बहुतांश कामगार करार करून पैसे उकळतात अन् पसार होतात. त्यामुळे कारखान्यांचा मुकादमावरील व मुकादमाचा मजूरावरील विश्वास उडत चालला आहे. यंदा काही ठिकाणी मजूरवर्ग आम्हाला चकवा देत असल्याने आम्ही अडचणीत सापडलो आहोत. परिसरातील मजूर ढोकी, नळदूर्ग, गणेशनगर, संगमनेर, रावळगाव, कोपरगाव, श्रीरामपूर,  माळशिरस, प्रवरा आदी कारखान्यांच्या दिशेने उसतोडीसाठी जात आहे. सलग सहा महिन्यांच्या अथक परिश्रमानंतर ते गावाकडे परततील. ती दोन पैसे गाठीला शिल्लक राहण्याची आस घेऊनच. परंतु यंदा उसाच्या क्षेत्रात कमालीची घट झाल्याने केलेली उचल फिटण्याची साशंकता उसतोड कामगार श्रीधर वाव्हळ याने व्यक्त केली.

संपादन - गणेश पिटेकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com