
अतिवृष्टीने खरिप पिकासह शेत जमिनीचे प्रचंड नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने अनुदान जाहीर केले. मात्र दिवाळीपूर्वी ही रक्कम बँक खात्यावर जमा होण्याची आशा मावळली आहे.
उमरगा (जि.उस्मानाबाद) : अतिवृष्टीने खरिप पिकासह शेत जमिनीचे प्रचंड नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने अनुदान जाहीर केले. मात्र दिवाळीपूर्वी ही रक्कम बँक खात्यावर जमा होण्याची आशा मावळली आहे. तहसील कार्यालयाकडेच अनुदानाची रक्कम जमा झालेली नसल्याने प्रत्यक्षात बँक खात्यावर रक्कम जमा होण्यास विलंब होईल तोपर्यंत दिवाळीचा सण निघून जाणार असल्याने शेतकऱ्यांची यंदाची दिवाळी साधेपणाने होणार असल्याची स्थिती दिसते आहे.
मराठवाडा पदवीधर मतदारसंघासाठी भाजपकडून शिरीष बोराळकरांची उमेदवारी जाहीर, आता इच्छुकांमध्ये नाराजी
अतिवृष्टीच्या एका तडाक्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला. शेत जमिनीबरोबरच पिकेही पाण्यात अडकली. शासनाने दोन हेक्टर मर्यादेपर्यंत जिरायत व बागायत शेतीला दहा हजार तर फळबाग क्षेत्रासाठी पंचवीस हजाराचे अनुदान जाहीर केले. पण ही रक्कम एकुण नुकसानीच्या पंचवीस टक्केच असल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली. अनुदान रक्कमेवरून सत्ताधारी - विरोधकात राजकीय धूळवड झाली.
४४ कोटी ५६ लाख, ४५ हजार रुपये अनुदानाची प्रतिक्षा
अतिवृष्टीने तालुक्यात ४४ हजार ४६३ हेक्टर क्षेत्रांवरील पिकाचे नुकसान झाले आहे. शासनाने जाहीर केलेल्या अनुदान रक्कमप्रमाणे जिरायत क्षेत्राच्या ४१ हजार ८३२ हेक्टर नुकसानीपोटी ४१ कोटी ८३ लाख वीस हजार, बागायत क्षेत्राच्या दोन हजार ५७७ हेक्टर नुकसानीपोटी दोन कोटी ५७ लाख रुपये तर फळपिकाच्या ५४.२ हेक्टर क्षेत्राच्या नुकसानीपोटी तेरा लाख ५५ हजार रुपये असे एकुण ४४ कोटी ५६ लाख, ४५ हजार रुपये अनुदान रक्कम आवश्यक आहे. दरम्यान अनुदानाची रक्कम सोमवारी प्राप्त झालेली नव्हती. कदाचित दोन दिवसांत तहसील कार्यालयाकडे रक्कम प्राप्त झाली तरी बँकिंग प्रक्रियेला विलंब लागू शकतो. शुक्रवारपासुन तर दिवाळीचा सण सुरु होतो. सोमवारपर्यंत सुटीचा कालावधी असल्याने शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर रक्कम जमा होणे शक्य नाही. महसूलच्या कर्मचाऱ्यांनी लाभार्थी शेतकऱ्यांची यादी अद्ययावत करण्याची पूर्वतयारी सुरू केली आहे. रक्कम प्राप्त झाल्यानंतर तालुक्यातील ९६ गावाच्या लाभार्थांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम जमा केली जाणार आहे. मात्र दिवाळी सणात रक्कम मिळण्याची आशा मावळली आहे.
बारा टक्केच झाल्या पेरण्या
रब्बी हंगामातील पेरणीचे दिवस सुरु झाले आहेत. मात्र अतिवृष्टी व मागे झालेल्या सततधार पावसाने शेतात वाढलेले मायंदळ तण काढण्यासाठी मोजावी लागणारी किंमत, त्यानंतर जमिनीला येणाऱ्या वापसाची प्रतिक्षा शेतकऱ्यांना लागली आहे. दरम्यान ज्वारी पेरणीचा कालावधी निघून गेला आहे. आता हरभरा व गव्हाच्या पेरणीकडे शेतकऱ्यांचा कल आहे. रान तयार करण्यासाठी शेतकरी कोळपणीच्या कामाला लागला आहे.
बाराशे शेतकऱ्यांना अनुदानावरील हरभरा बियाणे
रब्बी हंगाम २०२०-२१ हरभरा बियाणे प्राप्त होण्यासाठी कृषी विभागाने परमीट लकी ड्रॉ पद्धतीने शेतकऱ्याची निवड केली. त्यात बाराशे शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अनुदानावरील तीस किलो हरभरा बियाणाचे वाटप संबंधित विक्रेत्याकडुन देण्याचे काम सुरु आहे. बहुतांश शेतकऱ्यांनी बियाणे घेतले आहे. मात्र बियाणाचा तुटवडा असल्याने उर्वरित शेतकऱ्यांना बियाणे मिळण्यासाठी महाबीज कंपनीकडे पाठपुरावा सुरू असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी सुनिल जाधव यांनी सांगितली.
संपादन - गणेश पिटेकर