घुंगराची खुळखुळ थांबली, उसाची झाली चिपाडं 

मधुकर कांबळे  
शनिवार, 30 मे 2020

धंदा जोमात येण्याच्यावेळीच लॉकडाऊन सुरू झाले आणि अडीच टन ऊस शिल्लक राहिला. साडे सहा हजार टन भावाने ऊस घेतला होता. पूर्ण ऊस वाळून गेला. हा ऊस नाइलाजाने जाधववाडी येथे जनावरांसाठी चारा करण्यासाठी तसाच देऊन टाकावा लागला. 

औरंगाबाद  : रणरणत्या उन्हात तहानेने घसा सुकायला होतो,तोंडाला कोरड पडते अशावेळी सहाजिकच घुंगरांचा खुऽ ळ , खुऽ ळ असा आवाज कानावर पडल्यानंतर रसवंतीकडे पावले वळतात. घशाखाली ऊसाच्या रसाचा घोट उतरताच कसं गाऽऽ र वाटते. मात्र यंदा नेमके उन्हाळ्याच्या तोंडावरच कोरोनाची साथ आली आणि रसवंती चालकांच्याच घशाला कोरड पडण्याची वेळ आली. ऊसाची पार चिपाडं होऊन गेली, नुकसान झाले सारा धंदाच बसला. असाच फटका रसवंत्यांना ऊस देणाऱ्या शेतकऱ्यांनाही सहन करावा लागला. शेतात उभा ऊस जनावरांना खाऊ घालण्याची वेळ आली आहे. 

कोरोना आला आणि अनेकांच्या जगण्याचे साधनच अधू झाले. अशीच परिस्थिती रसवंती चालकांच्या व त्यांना ऊस पुरवणाऱ्या शेतकऱ्यांची झाली आहे. दर वर्षी शहरात किमान ३०० ते ४०० रसवंत्या लागतात. रसवंत्या सुरू करण्यासाठी महापालिकेच्या मालमत्ता विभागाकडून जागेसाठी परवानगी घ्यावी लागते. यावर्षी महापालिकेने परवानग्या देण्यापूर्वी कोरोनाचे संकट आले. 

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

तीस हजाराचा ऊस वाळून गेला 

सिडको बसस्थानकावर वर्षभर रसवंती चालवणारे नवनाथ रसवंतीगृहाचे संजय पाटील म्हणाले, वर्षभर रसवंती चालू असते. मोठ्या संख्येने इथे प्रवासी येतात. चांगला सीझन सुरू होईल यासाठी मार्चमध्ये जास्तीचा ऊस मागवून ठेवला. पण कोरोनामुळे ३० हजाराचा ऊस जागेवरच वाळून गेला आहे. 

दरवर्षी दोन तीन रसवंत्या चालवणारे ज्ञानेश्‍वर शेळके म्हणाले, माझा रसवंतीच पूर्ण आधार असते. गेल्यावर्षी तीन रसवंत्या होत्या. यावर्षी दोन ठिकाणी रसवंत्या सुरू केल्या होत्या. मात्र धंदा जोमात येण्याच्यावेळीच लॉकडाऊन सुरू झाले आणि अडीच टन ऊस शिल्लक राहिला. साडे सहा हजार टन भावाने ऊस घेतला होता. पूर्ण ऊस वाळून गेला. हा ऊस नाइलाजाने जाधववाडी येथे जनावरांसाठी चारा करण्यासाठी तसाच देऊन टाकावा लागला. 

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

घाट्यात द्यावा लागला चाऱ्यासाठी ऊस 

फुलंब्री तालुक्यातील सांजुळचे शेतकरी कल्याण जाधव शहरातील रसवंत्यांना ऊसाचा पुरवठा करतात. त्यांच्यावरही कोरोनाने नुकसान सहन करण्याची वेळ आणली.श्री.जाधव म्हणाले, दोन एकरात ऊस यंदा तयार होता. शहरातील १५-१५ रसवंत्यांना ऊस देत असतो. लॉकडाऊनच्या आधी काहींना ऊस दिला त्यानंतर लॉकडाऊन सुरू झाला त्या ऊसाचे पैसेही अडकून पडले आहेत. आता तर सारा सीझन गेला त्यामुळे आता ऊस कोणी घेईल अशी परिस्थिती राहिली नाही. रसवंत्यांना ५ हजार रूपये टन दराने ऊस देत असतो पण यंदा १ हजार रुपये टन दराने जनावरांना चार तयार करण्यासाठी द्यावा लागला. यंदा सारा घाट्याचाच सौदा झाला.यातून कसे बाहेर निघू येणारा काळच सांगेल असे ते म्हणाले. 

बहुतांश ठिकाणी रसवंत्यांची नावे नवनाथ
 
बहुतांश ठिकाणी रसवंत्यांची नावे नवनाथ रसवंती, कानिफनाथ रसवंती अशीच वाचायला मिळतात. नावावरून ही कोणा एका व्यक्तीच्याच रसवंती असतील असे वाटावे मात्र याचे कारण यापेक्षा वेगळे आहे. नवनाथ रसवंतीचे जयवंत फडतरे यांनी सांगितले, ऊसाच्या रसाला रसवंतीच्या माध्यमातून कमर्शियल स्वरूप दिले ते पुणे जिल्ह्याच्या पुरंदर तालुक्यातील बोपगाव इथल्या शेतकऱ्यांनी. बोपगावात नवनाथांपैकी एक असलेले कानिफनाथांचे गुहेमध्ये मंदिर आहे. आपल्या गावाची ओळख, श्रद्धास्थान असलेल्या नवनाथांचे रसवंतीला नाव दिले जाते तर शेतकऱ्याला मदत करणाऱ्या बैलांची सतत आठवण राहावी यासाठी बैलाच्या गळ्यातील घुंगरमाळेतील घुंगरं रसाच्या चरख्याला बांधत असल्याचे सांगितले. 

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sugarcane Juice Centre Stop Due To Corona Virus Aurangabad News