esakal | आठ महिन्याच्या बाळाने दिला आईला अग्नी! 
sakal

बोलून बातमी शोधा

patil news.jpg

उपस्थितांचे डोळेही पाणावले : प्रेमविवाह झालेल्या महिलेचा संशयास्पद मृत्यू 

आठ महिन्याच्या बाळाने दिला आईला अग्नी! 

sakal_logo
By
किशोर पाटील

दौलताबाद (औरंगाबाद) : माळीवाडा (ता. औरंगाबाद) येथील प्रेमविवाह झालेल्या महिलेचा संशयास्पद मृत्यू झाल्यानंतर पतीने गळा दाबून खून केल्याचा आरोप माहेरच्या नातेवाईकांनी केला आहे. दरम्यान, अंत्यसंस्कारावेळी तिच्या आठ महिन्याच्या बाळाच्या हाताने अग्नि देण्यात आला. हे पाहून उपस्थितांचेही डोळे पाणावले होते.

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!
 
माळीवाडा येथील सोनाली बाबासाहेब तुपे (वय २१) हिचा विवाह गावातीलच किरण अशोक साठे याच्या सोबत दोन वर्षांपूर्वी झाला होता. नवीन संसार थाटल्यानंतर दोघेही गुण्या गोविदांने राहू लागले. त्यांच्या संसाराचा वेलही फुलला. घरी बाळाचे स्वागत झाले. असं म्हणतात सुखी संसाराला कुण्या मेल्याचीही नजर लागू नये. मात्र, सोनालीच्या संसाराला कोणाची नजर लागली ते देवच जाणो. सुखी संसारात आता वादावादी सुरु झाली. छोट्या छोट्या गोष्टीवरुन खटके उडू लागले. आठ महिन्याच्या बाळासमवेत आनंदाचे क्षण घालविण्याऐवजी रोजच होणार्या भांडणाने घरात अशांतता निर्माण झाली होती. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

त्यातच गुरुवारी (ता.२९) दोघात कडाक्याचे भांडण झाले व सायंकाळी सोनालीचा संशयास्पदरीत्या मृतदेह राहत्या घरी आढळून आला होता. यानंतर सोनालीला सासरच्या मंडळींनी घाटीत दाखल केले. डॉक्टरांनी तपासून मृत घोषीत केले. या नंतर दौलताबाद पोलीस ठाण्यात या घटनेची माहिती देण्यात आली. 

आक्रोश झाला, सर्वांचे डोळे पाणावले 

शवविच्छेदनानंतर शुक्रवारी पोलीस बंदोबस्तात सोनालीवर माळीवाडा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी तिच्या आठ महिन्यांच्या मुलाच्या हाताने अग्नि देण्यात आला. हे दृश्‍य बघून उपस्थितांचेही डोळे पाणावले होते. उपनिरीक्षक के. पी. कांबळे, पोलिस हेड कॉन्स्टेबल व्ही. व्ही. करंजे व पोलिस कर्मचारी यांच्यासह पोलीस पाटील प्रमोद साठे उपस्थित होते. दरम्यान, या प्रकरणात पोलीस निरीक्षक राजश्री आढे तपास करीत आहेत.

(संपादन-प्रताप अवचार)