Coronavirus : धक्कादायक! बाधित १७ वर्षीय मुलाची आई गर्भवती

Wednesday, 15 April 2020

या सतरावर्षीय मुलाची आई गर्भवती असल्याने त्यांना औरंगाबाद शहरात प्रसूती करायची आहे. त्यासाठीच लॉकडाऊनच्या काळात सर्व सोपस्कार पार पाडून विशेष रुग्णवाहिकेद्वारे गर्भवती महिला, सतरा वर्षांचा मुलगा व त्याचे वडील दहा एप्रिलला औरंगाबादेत आले होते​.

औरंगाबाद - शहरातील बायजीपुरा भागात मुंबईहून औरंगाबादेत आलेल्या एका १७ वर्षीय मुलाला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. विशेषतः बाब म्हणजे त्याची आई गर्भवती आहे. हे सर्व एकत्रित एका रुग्णवाहिकेतून औरंगाबादेत आले होते. त्यामुळे आता गर्भवती आईची दुसऱ्यांदा चाचणी होणार असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी यांनी दिली. 

बायजीपुरा येथील कुटुंब मुंबई येथे राहते. तेथे राहणाऱ्या या कुटुंबात आई-वडील आणि सतरावर्षीय मुलाचा समावेश आहे. या सतरावर्षीय मुलाची आई गर्भवती असल्याने त्यांना औरंगाबाद शहरात प्रसूती करायची आहे. त्यासाठीच लॉकडाऊनच्या काळात सर्व सोपस्कार पार पाडून विशेष रुग्णवाहिकेद्वारे गर्भवती महिला, सतरा वर्षांचा मुलगा व त्याचे वडील दहा एप्रिलला औरंगाबादेत आले होते; परंतु शहराजवळील महापालिकेच्या नाक्यावर त्यांना अडविण्यात आले. तेथील अधिकाऱ्यांनी या कुटुंबाला औरंगाबादेतील चिकलठाणा येथील जिल्हा रुग्णालयात तपासणी करून घेण्याचा सल्ला दिला. त्यानुसार हे कुटुंब सोमवारी (ता. १३) जिल्हा रुग्णालयात दाखल झाले. त्यांनी त्यांची प्रवासाची माहिती डॉक्टरांना दिली. त्यानंतर डॉक्‍टरांनी तिघांचेही स्वॅब घेत प्रयोगशाळेत पाठविले.

काय सांगता - औरंगाबादकरांनो सावधान! २४ तासांत शहरात आली दीड हजार वाहने 

यापैकी वडिलांचे स्वॅब निगेटिव्ह आले आहेत; मात्र सतरावर्षीय मुलाचे नमुने पॉझिटिव्ह आले. आईची चाचणी करण्यात आली; मात्र आता फेरतपासणी करण्यात येणार आहे. वडिलांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली; पण त्यांचे पुन्हा पाच दिवसांनी स्वॅब घेण्यात येणार असल्याचे डॉक्टर सुंदर कुलकर्णी यांनी सांगितले. 

आई नऊ महिन्यांची गर्भवती 

औरंगाबादेत सतरावर्षीय मुलाची आई नऊ महिन्यांची गर्भवती आहे. प्रसूतीसाठी त्या औरंगाबादला आल्या; मात्र आता मुलालाच कोरोनाची लागण झाल्यामुळे आईची जास्त दक्षता घेतली जात आहे. त्यांचा रिपोर्ट कसाही आला तरी प्रसूतीसाठी त्यांना घाटी रुग्णालयात पाठवावे लागणार आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Swab Examination Of a Pregnant Woman