औरंगाबादकरांनो सावधान! २४ तासांत शहरात आली दीड हजार वाहने

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 14 April 2020

  • आले तीन हजार जण 
  • पोलिसांची ढील
  • शहरात येणाऱ्यांची वाढली संख्या

औरंगाबाद - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभर संचारबंदी लागू असली, तरी शहरात येणाऱ्यांचे प्रमाण मात्र कमी झालेले नाही. गेल्या चोवीस तासांत औरंगाबाद शहरात नगर नाकामार्गे १,५५५ वाहनांमधून ३,१४७ लोक शहरात दाखल झाल्याचे महापालिकेच्या आरोग्य विभागाने केलेल्या तपासणीतून समोर आले आहे. शहरात येणाऱ्या या प्रवाशांमुळे कोरोना वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. 

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी २४ मार्चपासून देशभर लॉकडाऊन करण्यात आले आहे. १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊनची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती. या काळात नागरिकांनी आहे त्या ठिकाणी थांबावे, असे आदेश देण्यात आले; तसेच जिल्ह्याच्या सीमाही बंद करण्यात आल्या; मात्र ही बंदी मोडून शहरात येणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. औरंगाबाद शहरात मुंबई, पुणे, नाशिकसह इतरही भागांतून हजारो लोक दाखल होत आहेत.

लॉकडाऊनपूर्वीच महापालिकेने शहराच्या चारही दिशांना व रेल्वेस्टेशन, बसस्थानकावर स्क्रीनिंग सेंटर सुरू केले होते. बाहेरून शहरात दाखल होणाऱ्या प्रत्येकाची या ठिकाणी आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. ही बसस्थानक व रेल्वेस्टेशन वगळता इतर ठिकाणचे स्क्रीनिंग सेंटर अजूनही सुरूच आहेत. आतापर्यंत शहरात नगर नाका, केंब्रिज नाका आणि हर्सूल येथून तब्बल एक लाख ६६ हजार लोक शहरात दाखल झाले आहेत. यात सर्वाधिक एक लाख ४३ हजार लोक हे नगर नाका (टोल नाका) छावणी मार्गे शहरात आले आहेत. मंगळवारी चोवीस तासांत नगर नाकामार्गे तब्बल १,५५५ वाहने आणि या वाहनांमधून ३,१४७ लोक शहरात दाखल झाल्याचे महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या नोंदीवरून समोर आले आहे. 

हेही वाचा -  औरंगाबादेत सतरा वर्षीय मुलगा पॉझिटीव्ह, संख्या पंचवीसवर 

पोलिसांची ढील वाढविणार कोरोना 

लॉकडाऊन काळातही शहरात हजारो लोक येत असल्यामुळे महापालिकेने चिंता व्यक्त केली. जिल्हाधिकारी, महापौरांनी यासंदर्भात पोलिस आयुक्तांशी चर्चा करणार असल्याचे म्हटले होते; मात्र फक्त दोन दिवस वगळता शहरात येणाऱ्यांचे प्रमाण काही घटलेले नाही. या प्रवाशांमुळे शहराचा कोरोना धोका वाढण्याची शक्यता आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Three Thousand Vehicles Arrived In Aurangabad