
औरंगाबाद - कोरोनाच्या काळात एकीकडे मदतीसाठी हजारो हात पुढे येत असतानाच उद्याच्या काळजीने सर्वच गोष्टींचा साठा करून ठेवण्याची प्रवृत्तीही वाढली आहे. अनेक ठिकाणी माणसातील माणुसकी हरवत चाललेली पहायला मिळते. पण या प्रवत्तीला छेद दिलाय ज्ञानेश्वरवाडी जि.प. शाळेचे मुख्याध्यापक अय्युब शेख यांनी. त्यांनी स्वतःच्या शेतात पिकवलेले दहापैकी आठ पोती धान्य गोरगरिबांची चूल पेटविण्यासाठी वाटून दिले.
लॉकडाऊनमळे गरजू व गरीब आदिवासी बांधवांना पंधरा दिवसांपासून रोजगार नसल्यामुळे घरातच बसण्याची वेळ आली आहे. मुख्याध्यापक अय्युब उस्मान शेख (रा. कुरणपिंपरी) यांना तुकारामाचे अभंग, हरीपाठ तसेच कुराण तोंडपाठ आहे. गोरगरीबांची उपासमार त्यांनी जवळून पाहिली. दलीत वस्तीवरील मुलांची भाकरीसाठी उन्हातान्हात गावात फिरणे पाहून त्यांचे मन गहिवरुन आले. त्यांनी पत्नीशी चर्चा करत शेतातील दहापैकी आठ पोते गरीब मजूरांना वाटण्याचा विचार व्यक्त केला.
औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा
पत्नीनेही त्यांना पाठिंबा दर्शविला. त्यासाठी तहसीलदार यांच्या परवानगी घेवून त्यांनी आपेगाव, तसेच परीसरातील वाड्या, वस्त्यावरील गरजू, गरीब कुटूंबाला प्रत्येकी पाच किलो धान्य वाटप केले. यासाठी गावातील पोलीस पाटील व कोतवाल यांच्या मदतीने सोशल डिस्टन्स ठेवत धान्य वाटप करण्यात आले. त्यांच्या या मानवतावादी कार्याचे सर्वच स्तरावरुन कौतूक केले जात आहे. शिक्षक सेनेतर्फे त्यांचे विशेष कौतूक करण्यात आले.
मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा
लॉकडाऊन संपेपर्यंत
सर्वांसाठी मदत
याबाबत मुख्याध्यापक अय्युब शेख यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगीतले की, यंदा आमच्या शेतात दहा पोते गव्हाचे उत्पादन झाले होते. पंरतू, लॉकडाऊनमुळे गावाच्या आजूबाजूला असलेल्या वस्त्या, तांडे, दलीतवाड्यात परिस्थिती बीकट झाली आहे. अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. ही परिस्थिती पाहून मी स्वतःच्या घरातील धान्याचे कोठार खुले करुन प्रत्येका पाच किलो गव्हाचे वाटप केले आहे. लॉकडाऊन संपेपर्यंत सर्वांसाठी मदत करत राहाणार.