सावलीतही बसतोय झळांचा चटका 

मधुकर कांबळे
Wednesday, 27 May 2020

पाच - सहा दिवसांपासून उन्हाचा पारा वाढला आहे. मंगळवारी (ता.२६) ऊनसावल्यांचा खेळ सुरू असला तरीही शिराळ पडल्यावरसुद्धा उष्ण हवेच्या झळा असह्य करणाऱ्या होत्या. सध्या ऊन वाढले असले तरी नैर्ऋत्य मॉन्सूनचे वेळेवर आगमन होण्यासाठी हे ऊन पूरक असल्याचे अभ्यासकांनी सांगितले. 

औरंगाबाद : निरभ्र आकाशामुळे आणि बाष्पयुक्त ढगांचा कसलाच अडथळा नसल्याने गेल्या पाच - सहा दिवसांपासून उन्हाचा पारा वाढला आहे. मंगळवारी (ता.२६) ऊनसावल्यांचा खेळ सुरू असला तरीही शिराळ पडल्यावरसुद्धा उष्ण हवेच्या झळा असह्य करणाऱ्या होत्या. सध्या ऊन वाढले असले तरी नैर्ऋत्य मॉन्सूनचे वेळेवर आगमन होण्यासाठी हे ऊन पूरक असल्याचे अभ्यासकांनी सांगितले. 

लॉकडाउनमुळे वाहने फारशी रस्त्यावर आली नाहीत. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत तापमानात चक्क उन्हाळा असूनही वाढ झाली नव्हती. मात्र गेल्या पाच सहा-दिवसांत उन्हाचा चटका चांगलाच जाणवत आहे. जिथे झाडे आहेत त्या परिसरातील घरांमध्ये बसण्यासारखी परिस्थिती आहे; मात्र जिथे झाडे नाहीत तिथे पंखे, कूलर लावण्याशिवाय पर्याय राहिला नाही. दिवसाही उष्णता आणि रात्री उकाडा जाणवत आहे. मधूनच सूर्य ढगाआड गेल्यानंतर काही काळासाठी सावली पडत असली तरी उष्ण हवेच्या झळा लागत आहेत. 

हेही वाचा- शिवसेनेच्या नाकीनऊ आणलेल्या या माजी आमदाराने राजीनामा कुठं दिला?

अचानक गेल्या पाच-सहा दिवसांपासून वाढलेल्या तापमानांच्या कारणांविषयी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या भूगोल विभागाचे प्रमुख, हवामानाचे अभ्यासक डॉ. मदन सूर्यवंशी यांनी सांगितले, की काही दिवसांपूर्वी बंगालच्या उपसागरात अम्फान वादळ आले होते. याचा बारा ते चौदा दिवसांचा काळ होता. ज्यावेळी हे वादळ आले त्यावेळी आपल्याकडे उन्हाळा सुरू होता. या वादळामुळे बाष्पयुक्त ढग आल्याने नेहमीप्रमाणे उष्णतेची दाहकता जाणवली नाही. या वादळानंतर आता आकाश निरभ्र झाले आहे, बाष्पयुक्त ढग नाहीत आणि हवेत आर्द्रतेचे प्रमाण नसल्याने उन्हाची तीव्रता वाढली आहे.

आणखी काही दिवस ही लाट अशीच राहील. तथापि, ऊन जेवढे जास्त कडक पडेल तेवढे नैर्ऋत्य मॉन्सूनच्या आगमनासाठी चांगले. उन्हामुळे बाष्पीभवनाचा वेग वाढणार असल्याने पाऊसही चांगलाच पडतो. मानवी शरीराचे तापमान ३७-३८ डिग्री सेल्सिअस असते; मात्र यापुढे तापमान वाढले तर उष्माघात होऊ शकतो. याचा लहान मुले, वृद्ध, शेतात काम करणाऱ्यांना जास्त त्रास होतो असे डॉ. सूर्यवंशी म्हणाले.  

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tempreture Hike Aurangabad News