मुलासह दोघे बुडाले, पित्याला वाचवण्यात यश

अनिलकुमार जमधडे
Thursday, 16 July 2020

-मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष
-एका महिन्यातील दुसरी घटना
-पोहणाऱ्यांची वाढती संख्या धोकादायक

औरंगाबाद : मिटमिटा (गट न. ३०७) परिसरातील तलावात पोहण्यासाठी आलेल्या तीघांपैकी दोघेजण पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाले तर एकाला वाचवण्यात स्थानिक नागरीकांना यश आले. बुडालेल्या मुलाच्या वडीलांना नागरीकांनी  वाचवले आहे. कासंबरी दर्गा भागातील डोंगरानजीक मोठा तलाव आहे. या ठिकाणी सकाळी किमान साडेदहा वाजता पोहण्यासाठी पडेगाव येथील मजूरकाम करणारे सुनील शंकरराव घोलप (वय ३५) व त्यांचा मोठा मुलगा सूमित घोलप (वय १५) आणि त्याच्या मेहुण्याचा मुलगा रोहीत देशमुख (वय ८ रा. कैलास नगर) हे आले होते. परंतु पाण्याचा अंदाज न आल्याने तीघेही बुडत असल्याचे जवळच्या वीटभट्टीवर काम करणाऱ्या मजुरांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने धाव घेत मदत कार्य केले, त्यामुळे सुनील घोलप यांना वाचवण्यात यश आले. परंतु त्यांच्या सोबतचे सुमीत आणि रोहित हे दोघेही पाण्यात बुडाले, त्यांना मात्र वाचवता आले नाही. 

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

मदतीला धावले स्थानिक

घटनेची माहिती मिटमिटा येथील सामाजिक कार्यकर्ते शिवाजी गायकवाड यांना एका गुरे चारणाऱ्या एका व्यक्तीने दिली. त्यानंतर गायकवाड यांनी त्यांनी घटनास्थळ गाठले तोपर्यंत दोघजण बुडाल्याचे लक्षात आले. नागरीकांनी पोलिस आणि अग्निशामक दलाला माहिती दिली. 

अग्निशामक दलाचे परिश्रम

अग्निशमन विभागाचे पथक प्रमुख एच. वाय. घुगे, सुजीत कल्याणकर, इम्रान पठाण, महेश मुंढे, अमोल चौधरी, शेख रशीद यांनी एक तासाच्या परिश्रमानंतर दोन्ही मुलांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढले. घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. छावणी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अतुल ठोकळ व त्यांच्या सहकाऱ्यांनी जमावाला पांगवत दोन्ही  मृतदेह टू मोबाईल व्हॅन द्वारे घाटी रुग्णालयात पोहचवले. 

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

प्रशासनाचे दुर्लक्ष

मृत पावलेल्या दोन्हीही मुलांचे आई-वडील मोलमजुरी करून पोट भरणारे आहेत. त्यामुळे या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. महिन्याभरापुर्वी सुद्धा अशीच घटना घडून दोन मुलांचा मृत्यू झाल्याचे नागरीकांनी सांगितले. सातत्याने होणाऱ्या या घटनांकडे मनपा प्रशासन तसेच पोलीस विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. 

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी क्लिक करा

पोहणाऱ्यांची संख्या वाढती 

तलावात चांगले पाणी आल्यामुळे पोहणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या भागात दररोज किमान शंभर पेक्षा अधिक लोक पोहण्यासाठी येत असतात. त्यांना प्रतिबंध करणे गरजेचे आहे. या लोकांना समजावून सांगतो परंतु ते आम्हालाच दमदाटी करतात असे येथील मच्छीमार श्री. बिरजू यांनी सांगितले.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: They both drowned in the lake