
पैठण शहराजवळील जुने कावसन या गावात एकाच कुटुंबातील तीन जणांचा तीक्ष्ण हत्याराने खून केलेल्या घटने प्रकरणी पैठण पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आहे.
पैठण (जि.औरंगाबाद) : पैठण शहराजवळील जुने कावसन या गावात एकाच कुटुंबातील तीन जणांचा तीक्ष्ण हत्याराने खून केलेल्या घटने प्रकरणी पैठण पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आहे. यासाठी पोलिसांचे तीन पथक स्थापन करीत मारेकऱ्याच्या शोध सुरु केला असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. तसेच हा तपास निश्चित दिशेने सुरु असून मारेकऱ्यांना पोलिस लवकरात लवकर ताब्यात घेतील, असे सूत्रांनी सांगितले.
जुने कावसन येथे शनिवारी (ता.२७) मारेकऱ्यांनी पहाटेच्या सुमारास निवारे कुटुंबातील पती राजू निवारे, पत्नी अश्विनी व मुलगी सायली या तिघांचा तीक्ष्ण हत्याराने झोपेत वार करून खून केला होता. या घटनेची माहिती मिळताच पोलिस उप अधीक्षक गोरक्ष भामरे, पोलिस निरीक्षक किशोर पवार, फौजदार सी. जी. गिराशे, रामकृष्ण सागडे यांनी घटनास्थळी तातडीने भेट देऊन पाहणी केली. यानंतर पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी ही भेट देत घटनेचा वेगाने तपास करून गुन्हेगाराला जेरबंद करण्याचे आदेश दिले. त्यानुसार या तिहेरी हत्याकांडाची सखोल माहिती घेवुन पैठण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक किशोर पवार, जिल्हा गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक भागवत फुंदे यांनी पोलिस पथक तैनात करीत तपास सुरु केला आहे.
तीन पथकाद्वारे मारेकऱ्याच्या शोध पोलिस घेत आहेत. तपास पथकाची यंत्रणा राज्यभरातील विविध भागात कार्यरत असल्याचे ही सांगितले जात आहे. दरम्यान, या घटनेत मारेकऱ्यांकडून मानेवर, चेहरा व हातावर तीक्ष्ण हत्याराने वार झाल्याने सहा वर्षीय मुलगा सोहम राजू निवारे गंभीर जखमी झाला होता. आता तो शुद्धीवर आला आहे. त्याच्यावर औरंगाबाद येथील एका खासगी रुग्णालयात सुरु आहे. त्याची प्रकृती सुधारत असल्याचे समजते.
संपादन - गणेश पिटेकर