औरंगाबाद जिल्ह्यात वीज पडून दोघे ठार, विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू

सुनील पांढरे/सचिन चोबे
Sunday, 18 October 2020

औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यात रविवारी (ता.१८) घडलेल्या वेगवेगळ्या घटनांमध्ये दोघांसह गायीचा वीज पडून, तर एका तरुणाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला.

पळशी /सिल्लोड (जि.औरंगाबाद) : औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यात रविवारी (ता.१८) घडलेल्या वेगवेगळ्या घटनांमध्ये दोघांसह गायीचा वीज पडून, तर एका तरुणाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. पळशी (ता.सिल्लोड) परिसरात रविवारी दुपारी तीनवाजेच्या सुमारास तीन ठिकाणी विज पडल्याची घटना घडली. यात दोघांचा मृत्यू झाला, तर एक गाय दगावली.

‘ब्रह्मगव्हाण’चे पाणी शेवटच्या गावास मिळेल तो क्षण आनंदाचा असेन, रोहयो मंत्री भुमरेंचा पण

यात पळशी येथे विज पडून शेतात काम करणाऱ्या ४२ वर्षीय महिलेचा, तर खातखेडा येथे मजुरीसाठी आलेल्या मध्य प्रदेश येथील एका २० वर्षीय तरुणाचा समावेश आहे. कांताबाई गंगाधर सोनवणे (वय ४२, रा.पळशी) व सोविन दिनेश जामरे (वय २०, रा. डोंगर चिंचोली, जि. खरगोन, मध्य प्रदेश) असे विज पडून मृत्यू पावलेल्यांची नावे आहेत.

रविवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास तालुक्यातील अनेक भागांत विजेच्या कडकडाटासह पाऊस झाला. यात तालुक्यातील पळशी येथे श्री लक्ष्मी देवी मंदिराजवळ विज पडल्याने कांताबाई सोनवणे यांचा मृत्यू झाला. त्या शेतात कापूस वेचणीचे काम करीत होत्या. अचानक वादळी वाऱ्यासह पाऊस सुरु झाल्याने त्या शेतातील घरी परत जात असतांना विज कोसळली. त्यांना शेजारील ग्रामस्थांनी तात्काळ धाव घेत सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. परंतु त्यांचा वाटेतच मृत्यू झाला. दुसऱ्या घटनेत तालुक्यातील खातखेडा येथे विज पडल्याने मध्य प्रदेश येथील तरुणाचा मृत्यू झाला.

अवास्तव शुल्क आकारल्याने जैन इंटरनॅशनल शाळेत तोडफोड करणाऱ्या मनसेच्या ‘त्रिकूटां’ना जामिन मंजूर

येथे मध्य प्रदेश मधील पंधरा- वीस मजुर मजुरीसाठी आलेले आहे. दुपारी हे मजूर कापूस वेचणीचे काम करीत असताना पाऊस सुरु झाला. यामुळे सर्व मजुर गावाकडे परत येत होते. या दरम्यान विज पडली व यात सोविन जामरेचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी धाव घेत तात्काळ मृतदेह सिल्लोड उपजिल्हा रुग्णालयात पाठवला. मोढा बुद्रुक (ता.सिल्लोड) दुपारच्या सुमारास त्यांच्या शेतात काम करीत असलेल्या सुशील गंगाधर जाधव (वय २३) यांचा विजेच्या तारेवर पाय पडल्याने विजेचा धक्का लागून मृत्यू झाला आहे.

टाकळीत गाय दगावली
दरम्यान तालुक्यातील टाकळी खुर्द येथे ही गावाशेजारी वीज पडली. यात परवेज ईसाक पठाण या शेतकऱ्याची गाय दगावली. सध्या ग्रामीण भागात कापूस वेचणीचे तसेच रबी पेरणीची लगबग सुरु आहे. यामुळे शेतकरी, शेतमजुर तसेच शाळा बंद असल्याने विद्यार्थी ही कापूस वेचणीचे काम करीत आहे. त्यात एकाच दिवशी परिसरात तीन ठिकाणी विज पडल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

 

संपादन - गणेश पिटेकर

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Thunder Storm Kills Two People With Cow Aurangabad News