तीन मिनिटे थांबा अन् ११ सेकंदांतच निघा! 

photo
photo

औरंगाबाद : शहरातील गोंधळात टाकणारी सिग्नल व्यवस्था आणि चुकीच्या पद्धतीचे असलेले चौक वाहनधारकांना डोकेदुखी ठरत आहेत. महावीर चौकामधून निघण्यासाठी ११ सेकंदांचा, तर थांबण्यासाठी १८० सेकंदांचा म्हणजे तीन मिनिटांचा वेळ आहे. ११ सेकंदांमध्ये निघणे शक्य झाले नाही तर तब्बल सहा मिनिटे थांबण्याची शिक्षा वाहनधारकांना भोगावी लागते. सिडकोतील वसंतराव नाईक चौकातही हीच अवस्था आहे. 
शहरात वर्दळीच्या जालना रस्त्यावर सिग्नल व्यवस्थांच्या वेळा गर्दीनुसार कमी-जास्त करणे आवश्यक आहे. मात्र एकच टायमिंग सेट केलेल्या सिग्नलमुळे वाहनांची गर्दी नसतानाही वाहनधारकांना दोन ते तीन मिनिटे थांबण्याची शिक्षा भोगावी लागते; अन्यथा सरळ सिग्नल तोडून निघावे लागते. काही चौकांत तर ज्या व्यक्तीला सिग्नल पाळायचे आहे, त्याला मात्र १८० सेकंदांपर्यंतची शिक्षा सहन करावी लागत आहे. 

महावीर चौक 

महावीर चौक (बाबा पेट्रोलपंप चौक) येथे रेल्वेस्टेशनकडून बसस्थानकाकडे जाताना अवघ्या अकरा सेकंदांमध्ये वाहनधारकाला निघावे लागते. वाहनांची रांग अधिक असेल आणि अकरा सेकंदांत निघणे शक्य झाले नाही तर १८० सेकंद आणि दोन-तीन वेळा जर सिग्नल लागला तर साडेपाच ते सहा मिनिटे थांबण्याची शिक्षा भोगावी लागते. याच सिग्नलवर विरुद्ध दिशेने म्हणजे बसस्थानकाकडून रेल्वेस्टेशनकडे जाताना ३७ सेकंदांचा वेळ आहे. या बाजूला एनए प्रिंटर पेट्रोलपंप (बाबा पंप) आहे. रस्त्यालगत महावितरणचे ट्रान्सफॉर्मर अडथळा करून आहे. त्यामुळे एका बाजूला मोठा तर दुसऱ्या बाजूला छोटा रस्ता असल्याने वाहनांच्या रांगा अनेक वेळा एम्प्लॉयमेंट ऑफिसपर्यंत गेलेल्या असतात. त्यावेळी ३७ सेकंदांत शेवटच्या वाहनधारकांना जाणे शक्य होत नाही. दोन अथवा तीनवेळा थांबावे लागते. या सिग्नलवर १५४ सेकंदांचा वेळ असल्याने साडेचार मिनिटांपर्यंत खोळंबा होतो. सातत्याने वाहनांची वर्दळ असल्याने वाहतुकीचा खोळंबा होत आहे. त्यामुळेच दोन्ही बाजूंच्या सिग्नलची वेळ वाढविण्याची गरज आहे. 

अमरप्रीत, आकाशवाणी चौक 

अमरप्रीत चौकातील सिग्नलवर रेल्वेस्टेशनच्या दिशेने जाताना आणि रेल्वेस्टेशनकडून चिकलठाण्याच्या दिशेने अशा दोन्ही वेळेला १०२ सेकंद थांबावे लागते आणि ७३ सेकंदांत निघावे लागते. आकाशवाणी चौकामध्ये चिकलठाण्याकडून क्रांती चौकाकडे जाताना थांबण्यासाठी ८५ सेकंद, तर निघण्यासाठी ७३ सेकंदांचा वेळ आहे. हा वेळही पुरेसा आहे, मात्र बऱ्याच वेळा ७३ सेकंदांचा वेळ मोठा असल्याने आणि ग्रीन सिग्नल असतानाही लाल सिग्नल तोडावे लागतात. 

सेव्हन हिल चौक 

सेव्हन हिल चौकामध्येही एमजीएमकडून जालना रोडकडे येतानाच्या सिग्नलवर थांबण्यासाठी ११६ सेकंदांचा वेळ दिलेला आहे, तर निघण्यासाठी मात्र ४८ सेकंद आहेत. वाहनांची रांग अनेक वेळा एमजीएम चौकापर्यंत जाते, तेव्हा निघण्याची वेळ कमी पडते. याच सिग्नलवर चिकलठाणा ते क्रांती चौक दिशेने जाताना १४५ सेकंद थांबावे लागते. निघायला मात्र अवघे २१ सेकंद वेळ दिलेला असल्याने हा वेळ कमी पडतो. 

वसंतराव नाईक चौक 

वसंतराव नाईक चौकामध्ये (सिडको बसस्थानक चौक) जळगाव रोडने सिडको बसस्थानक चौकामध्ये आल्यानंतर ४२ सेकंदांचा वेळ निघण्यासाठी आहे. ४२ सेकंदांत निघता आले नाही तर ११४ सेकंद थांबणे भाग आहे. अनेक वेळा वाहनांची रांग मोठी असेल तर दोनवेळा थांबावे लागते तर जवळपास पाच साडेपाच मिनिटांपर्यंत खोळंबावे लागते. याच चौकात क्रांती चौकाच्या दिशेने आल्यानंतर चिकलठाणाकडे जाताना २१ सेकंदांत निघावे लागते; अन्यथा १३४ सेकंद थांबावे लागते. दोनवेळा थांबावे लागले तर चार-साडेचार मिनिटे थांबून राहावे लागते. चिकलठाण्याच्या दिशेने आल्यानंतर क्रांती चौकाकडे जाताना ३७ सेकंदांत निघा; अन्यथा ११५ सेकंद थांबा अशी अवस्था आहे. 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com