एका गुन्ह्यात अडकले, दुसरा गुन्हा झाला उघड, महिला अधिकाऱ्याला मागितली 2 लाखांची खंडणी

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 6 September 2020

बीएसएनएलच्या उपमंडळ अधिकारी महिलेकडे पन्नास लाखांच्या खंडणीची मागणी केल्याप्रकरणी सात ते आठ जणांविरुध्द पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात तीन ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणात पोलिसांनी दोन अट्टल गुन्हेगारांना अटक केली आहे.

औरंगाबाद: बीएसएनएलच्या उपमंडळ अधिकारी महिलेकडे पन्नास लाखांच्या खंडणीची मागणी केल्याप्रकरणी सात ते आठ जणांविरुध्द पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात तीन ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणात पोलिसांनी दोन अट्टल गुन्हेगारांना अटक केली आहे.

दरम्यान, पाच सप्टेंबर रोजी त्यांच्याकडून दोन दुचाकी आणि चांदीचे दागिने हस्तगत करण्यात आले होते. त्यांनी खंडणीच्या गुन्ह्याची देखील कबुली दिली आहे. 
जालन्याच्या बीएसएनएल कार्यालयात उपमंडळ अधिकारी असलेल्या श्रीमती सुजाता बाबासाहेब नरवडे (वय ४२, रा. नंदनवन कॉलनी) या तीन ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास कार्यालयातील महिला श्रीमती भावसार आणि अधिकारी प्रसाद देशपांडे यांच्यासह कारने (क्र. एमएच-२०-ईजे-०७५७) औरंगाबादकडे येत होत्या.

हेही वाचाः हमालानेच लांबविले अडीच लाखांचे दागिने, नविन घरी सामान शिफ्ट करताना मारला डल्ला  

त्यावेळी त्यांच्या कारला सेव्हन हिल उड्डाणपुलाजवळ दुचाकीवर आलेल्या सहा ते सात जणांनी अडवून शिवीगाळ केली होती. तसेच आम्ही प्रशांत चंद्रमोरे व अ‍ॅड. नयुम शेख यांची माणसं आहोत. तुमच्याकडे पन्नास लाख रुपये शिल्लक आहेत, असे म्हणत खंडणीची मागणी केली होती. तसेच कारच्या काचेतून हात घालत त्यांनी श्रीमती नरवडे यांचा गळा धरण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, नरवडे यांच्यापर्यंत हात न पोहोचल्याने टोळक्याने कारवर समोरुन दगड फेकत काच फोडली होती. या प्रकरणी पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दरम्यान, पाच सप्टेंबर रोजी पुंडलिकनगर पोलिसांनी दुचाकी चोरीच्या प्रकरणात फिरोज खान जोहर खान (वय २३, रा. हुसेन कॉलनी) आणि फय्याज बशीर पठाण (वय ३०, रा. बायजीपुरा) यांना अटक केली आहे. त्यांनी श्रीमती नरवडे यांना खंडणी मागितल्याची कबुली दिली आहे. त्यावरुन त्यांना दुसऱ्या गुन्ह्यात देखील अटक करण्यात आली आहे. ही कारवाई पुंडलिकनगर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक घनश्याम सोनवणे, उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे, रावसाहेब मुळे, जमादार रमेश सांगळे, पोलिस नाईक बाळाराम चौरे, शिवाजी गायकवाड, राजेश यदमळ, दीपक जाधव, कल्याण निकम, विलास डोईफोडे, जालींदर मान्टे व आशिष राठोड यांनी केली.

हे वाचलंत का?- मिनी मंत्रालयातील ऑनलाईन सभा म्हणजे 'आजार म्हशीला अन इंजेक्शन पखालीला  

संपादनः सुषेन जाधव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two Arrested In The Matter Of Tribute Aurangabad News