हमालानेच लांबविले अडीच लाखांचे दागिने, नविन घरी सामान शिफ्ट करताना मारला डल्ला

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 25 August 2020

नवीन घरात सामान शिफ्ट करताना तब्बल अडीच लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने हमालाने लांबविल्याची घटना रविवारी (ता.२३) रात्री उघडकीस आली. गुन्हा दाखल होताच सिडको पोलिसांनी अवघ्या चार तासांत हमालाच्या मुसक्या आवळल्या.

औरंगाबाद: नवीन घरात सामान शिफ्ट करताना तब्बल अडीच लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने हमालाने लांबविल्याची घटना रविवारी (ता.२३) रात्री उघडकीस आली. गुन्हा दाखल होताच सिडको पोलिसांनी अवघ्या चार तासांत हमालाच्या मुसक्या आवळल्या.

विशेष म्हणजे त्याने चोरलेल्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांपैकी दोन लाख तीस हजारांचे दागिने पोलिसांनी जप्त केले आहेत. 
अजिमखान मोबीनखान पठाण (वय ३९, रा. कटकटगेट) असे त्या संशयिताचे नाव आहे.

हेही वाचा- मध्य प्रदेशच्या भाचीला ६ वर्षांनी सापडली महाराष्ट्रात मामी, एका फोनवर पोलिसांनी घेतला शोध

या प्रकरणात गजानन लोमटे (३४, रा. यशश्री हौ.सो., एन- ८, सिडको) हे कुटुंबीयांसह मयूरनगर, बीड बायपास येथील फ्लॅटमध्ये राहायला गेले आहेत. घरगुती सामान शिफ्ट करण्यासाठी लोमटे यांनी लोडिंग रिक्षाचालक खलील शेख याच्याशी बोलणी करून सामान शिफ्ट करण्यासाठी १७०० रुपये ठरविले.

त्यानुसार १५ ऑगस्ट रोजी खलीलने आझाद चौक येथून तीन हमाल घेऊन लोमटे यांचे घर गाठले. घरगुती सामान, बॉक्स व पोते लोड झाल्यानंतर घरातील एक लाकडी कपाट उचलताना जड लागत होते. म्हणून हमालांनी त्यातील सामान कमी करण्यास सांगितले. त्यावेळी लोमटे व त्यांची पत्नी यांनी कपाटातील दागिने एका बॉक्समध्ये टाकले. ही बाब तेथे उपस्थित एका हमालाने पाहिली.

हेही वाचा- Video: ‘ती’ राबते, सर्वांचे मन जपते पण तिच्या मनासारखं होतं का?  

दरम्यान, सर्व सामान लोमटे यांच्या नव्या घरी शिफ्ट करण्यात आले. २३ ऑगस्ट रेाजी सकाळी साडेअकरा वाजता लोमटे हे पत्नीसह फ्लॅटवरील सामान व्यवस्थित लावण्यासाठी गेले होते. त्यावेळी दागिने चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. प्रकरणात सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी अवघ्या काही तासांत तपास करून संशयित आरोपी हमाल अजिमखान पठाण याला गजाआड केले. त्याला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले असता, आरोपीला गुरुवारपर्यंत (ता. २७) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. जे. पाटील यांनी दिले. न्यायालयात पोलिस कोठडी देण्याची विनंती सहायक सरकारी वकील एस. आर. ढोकरट यांनी न्यायालयाकडे केली. 

हेही वाचा- सावधान..! ‘आर्सेनिक अल्बम-३० गोळ्यांचाही काळाबाजार

संपादनः सुषेन जाधव

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One Arrested In Matter Of Gold Stolen Aurangabad News