भरधाव झायलोच्या चालकाला पुलावर दिसली नाही येणारी गाडी...

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 फेब्रुवारी 2020

चोरवाघलगाव शिवारातील घटना : दोघे गंभीर जखमी 

वैजापूर (जि. औरंगाबाद) - भरधाव जाणारी महिंद्रा झायलो कार पुलावरून खाली कोसळून झालेल्या अपघातात दोनजण ठार, तर अन्य दोनजण गंभीर जखमी झाले.

ही घटना वैजापूर तालुक्‍यातील वैजापूर-गंगापूर राज्य महामार्गावरील चोरवाघालगाव (ता. वैजापूर) शिवारात घडली.

विक्रम वामनराव कुलथे (वय 55), चांगदेव पुंजाराम गायकवाड (55, दोघे रा. औरंगाबाद) असे अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत. 

पहा लातूरच्या जिल्हाधिकाऱ्यांचा डान्स

वैजापूरहून रविवारी औरंगाबादकडे निघालेली कार चोरवाघलगाव शिवारात आली असता समोरून येणाऱ्या चारचाकी वाहनाचा प्रखर प्रकाशझोत महिंद्रा झायलो कारचालकाच्या डोळ्यांवर पडल्याने त्याला समोरचा रस्ता दिसेनासा झाला. त्यामुळे झायलो कार पुलावरून खाली कोसळून झालेल्या अपघातात विक्रम कुलथे व चांगदेव गायकवाड हे ठार झाले.

चालक आकाश जाधव (28), योगेश पंडित (33, दोघे रा. औरंगाबाद) हे गंभीर जखमी झाले. परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेची माहिती उपजिल्हा रुग्णालयास कळविली. त्यानंतर आपत्कालीन रुग्णवाहिका घटनास्थळी पोचली. रुग्णवाहिकेतील वैद्यकीय अधिकारी डॉ. अंजर शहा, चालक अनिल सुरासे या दोघांनी ग्रामस्थांच्या मदतीने मृत दोघांसह जखमींना वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.

रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. आरती ढाकणे यांनी यातील दोघांना तपासून मृत घोषित केले. आकाश जाधव व योगेश पंडित या
दोघांनाही गंभीर दुखापत झाल्याने त्यांच्यावर प्रथमोपचार करून त्यांना पुढील उपचारार्थ औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात हलविण्यात आले. दरम्यान, याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलिस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली नव्हती. 

हेही वाचा - सोलापूर- सातारा मार्गावरील पूल कोसळला

सूचना फलक नसल्याने संभ्रम 

सध्या वैजापूर-गंगापूर महामार्गाचे काम प्रगतिपथावर आहे. या महामार्गावरील जुन्या रस्त्यासह जुने पूल पाडण्याचे काम सुरू आहे. राज्य महामार्गाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. ही बाब स्वागतार्ह असली, तरी संबंधित कंत्राटदाराने महामार्गाचे काम सुरू असताना जी काळजी घ्यावयास हवी ती घेतलेली दिसत नाही. महामार्गावर काम सुरू असलेल्या ठिकाणी दिशादर्शक किंवा सूचना फलक लावण्यात आलेले नाहीत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two killed in Car Accident