COVID-19 : औरंगाबादमध्ये कोरोनाचे आणखी दोन बळी, आज २४ रुग्णांची भर

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 13 May 2020

सकाळी तब्बल २४  रुग्णांचा अहवाल  पॉझिटिव्ह आला असून, आता औरंगाबादची रुग्णसंख्या ६५३ वरून ६७७ इतकी झाली आहे.

औरंगाबाद : शहरात आज (ता. १३) आणखी दोन कोरोना बाधित महिलांचा मृत्यू झाला. त्यामुळे शहरातील कोरोनाच्या मृत्यूचा आकडा 17 वर पोचला आहे. शहरातील गारखेडा परिसरातल्या हुसैन कॉलनी येथील 58 वर्षीय महिलेला काल (ता. १२) घाटी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. मृत्यूपूर्वी त्यांचे स्वॅब घेण्यात आले होते. मृत्यूनंतर त्यांचा पॉझिटिव्ह रिपोर्ट आला. तर औरंगाबाद शहरातीलच बीड बायपास रोडवरील ९४ वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान, आज सकाळी तब्बल २४  रुग्णांचा अहवाल  पॉझिटिव्ह आला असून, आता औरंगाबादची रुग्णसंख्या ६५३ वरून ६७७ इतकी झाली आहे.

coronavirus : या आहेत औरंगाबादमधील कोरोना योद्धा, असे चालते काम

शहरातील सर्वच भागात कोरोनाचा विळखा हळूहळू घट्ट होत आहे. आज सकाळी तब्बल २४ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून, आता औरंगाबादची रुग्णसंख्या ६५३ वरून ६७७ इतकी झाली आहे. २७ एप्रिलपासून आजपर्यंत ६२४ रुग्ण वाढले असून, आधीच्या ४२ दिवसांत ५३ रुग्ण होते.  दरम्यान कोरोनाबाधित दोन महिलांचा मृत्यू झाला. 

Coronavirus : औंरगाबादमध्ये या वसाहतींनी कोरोनाला रोखले, वाचा कसे...
 
आज या भागात आढळले रुग्ण 
पुंडलिकनगर,  सिडको एन-आठ चैतन्य हाऊसिंग सोसायटी, रामनगर,  संजयनगर, भावसिंगपुरा, पद्मपुरा, भुजबळनगर, नंदनवन कॉलनी, वृंदावन कॉलनी, नंदनवन कॉलनी, हुसेन कॉलनी, गांधीनगर, रविवार बाजार, जयभवानीनगर, विजयनगर, गारखेडा, सातारा परिसर, रहेमानिया कॉलनी गल्ली क्रमांक चार, घाटी कॅम्प, भडकलगेट, अरुणोदय कॉलनी या भागात कोरोनाबाधित रुग्ण आढळले. 
 
रुग्ण भरती करुन न घेणाऱ्या खासगी रुग्णालयावर कारवाई करा : टोपे 
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी औरंगाबाद जिल्ह्यात वाढत चाललेल्या रुगणसंख्या आणि त्यावर करण्यात येत असलेल्या उपाययोजनांविषयी आढावा घेतला. यावेळी ते म्हणाले की, जिल्ह्यातील सर्व यंत्रणा सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. कोविड बाधित गर्भवती  महिलांसाठी  स्वतंत्र खासगी रुग्णालयाची अथवा वार्डची निर्मिती करावी जेणेकरुन त्यांची अधिक चांगल्या प्रकारे काळजी घेता येईल.  तसेच घाटीमध्ये केवळ कोविड-१९ बाधित रुग्णांवर उपचार करावेत नॉन कोविड रुगण खाजगी रुग्णालयात भरती करावेत जे खाजगी रुग्णालय  रुग्ण भरती करुन घेण्यास टाळाटाळ करतील त्यांची मान्यता रद्द करण्यात यावी. तसेच ज्या कोविड-१९ बाधित रुग्णांमध्ये कोविडची लक्षणे नाहीत  त्यांच्यावर आयुष मंत्रालयाच्या निर्देशानुसार उपचार करण्याच्या सुचना देखील आरोग्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.
 
कोरोना मीटर 

  • उपचार घेत असलेले रुग्ण  : ५१५ 
  • बरे झालेले रुग्ण  : १४५
  • मृत्यू झालेले रुग्ण  : १७

एकूण : ६७७
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two One more dies of Covid-19 in Aurangabad