औरंगाबाद : दोन बहिणींचा त्याने केला विनयभंग, आता झाले असे...

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 1 March 2020

गुन्ह्यात तपास अधिकारी उपनिरीक्षक ए. व्ही. खंडागळे व डी. बी. कोपनार यांनी तपास करून दोषारोपपत्र दाखल केले. खटल्याच्या सुनावणीवेळी, सहाय्यक लोकाभियोक्ता अनिल हिवराळे यांनी आठ साक्षीदारांचे जबाब नोंदवले.

औरंगाबाद : आयटीआय येथे शिक्षण घेणाऱ्या दोघा बहिणींना आपण एकाच जातीचे असल्याची बतावणी करून त्यांच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न तसेच त्यांचा पाठलाग करून विनयभंग करणाऱ्या आयटीआयचा शिल्प निदेशकाला दोन वर्षे सक्तमजुरी व विविध कलमांखाली २२ हजार ५०० रुपयांचा दंडाची शिक्षा विशेष न्यायाधीश डॉ. एम. एस. देशपांडे यांनी ठोठाविली. विशेष म्हणजे ठोठाविण्यात आलेल्या दंडाची रक्कम दोघा पीडितांना विभागणी करून देण्याचेही न्यायालयाने आदेशात म्हटले आहे. भगवान गोविंद पवार (४०)असे त्या आरोपीचे नाव आहे.

हेही वाचा-  Video : भाजपला संधी द्या, औरंगाबादचे चित्रच बदलू : चंद्रकांत पाटील

१७ वर्षीय पीडितेने आयटीआयच्या एका कोर्ससाठी प्रथम वर्षात प्रवेश घेतला होता. प्रवेशाच्या १५ दिवसांनी दुपारी पीडिता व तिची बहीण आयटीआय परिसरात गप्पा मारत बसल्या होत्या. त्यावेळी आरोपी पवार त्यांच्या जवळ आला व त्याने त्यांना जात विचारली, आपण एकाच जातीचे असल्याचे सांगत त्याने आपण नातेवाईक असल्याची बतावणी केली. त्यानंतर भामट्याने दोघींचे मोबाइल क्रमांक घेतले व काही अडचण असल्यास मला भेटा असे सांगितले. त्यानंतर भामट्याने दोघींना पत्नी घरी नसून आपण हॉटेलमध्ये जेवण करायला जाऊ, माझे न ऐकल्यास परीक्षेत नुकसान करील अशी धमकी दिली. या घटनेनंतर आरोपी हा पीडिता व तिच्या बहिणीचा वारंवार पाठलाग व त्यांना फोन करून त्रास देत होता. प्रकरणात क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हेही वाचा- भाजपमधील आरोपींपासूनच महिलांना सर्वाधिक धोका

आठ साक्षीदारांचे नोंदविले जबाब
गुन्ह्यात तपास अधिकारी उपनिरीक्षक ए. व्ही. खंडागळे व डी. बी. कोपनार यांनी तपास करून दोषारोपपत्र दाखल केले. खटल्याच्या सुनावणीवेळी, सहाय्यक लोकाभियोक्ता अनिल हिवराळे यांनी आठ साक्षीदारांचे जबाब नोंदवले. त्यात पीडितेसह तिच्या बहिणीची साक्ष महत्त्वाची ठरली. दोन्ही बाजूंच्या युक्तिवादानंतर व साक्ष-पुराव्यांवरून न्यायालयाने भगवान पवार याला एक वर्षे सक्तमजुरी व दहा हजार रुपये दंड, इतर कलमान्वये सहा महिने सक्तमजुरी व अडीच हजार रुपये दंड, पोक्सोच्या कलमानुसार दोन वर्षे सक्तमजुरी व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने ठोठाविली. खटल्यात पैरवी अधिकारी म्हणून यू. एच. तायडे यांनी काम पाहिले.

हे वाचलंत का? - औरंगाबाद मनसेच्या जिल्हाध्यक्षपदी हर्षवर्धन जाधव, दाशरथे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: two year jail in the matter of sexual harassment Aurangabad News