औरंगाबाद जिल्ह्यात दीडशेवर शेतकरी उत्पादक कंपन्या, ‘आत्मां’ने घेतला पुढाकार

मधुकर कांबळे
Sunday, 20 December 2020

शेतकऱ्यांनी शेतमालांचे मूल्यवर्धन करून त्यांची मूल्यवर्धन साखळी तयार करावी आणि त्यातुन शेतीमालाला चांगला भाव मिळावा. शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर पडावी यासाठी आत्मा अंतर्गत शेतकरी उत्पादक कंपन्यांची स्थापना करण्यात येते.

औरंगाबाद : शेतकऱ्यांनी शेतमालांचे मूल्यवर्धन करून त्यांची मूल्यवर्धन साखळी तयार करावी आणि त्यातुन शेतीमालाला चांगला भाव मिळावा. शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर पडावी यासाठी आत्मा अंतर्गत शेतकरी उत्पादक कंपन्यांची स्थापना करण्यात येते. जिल्ह्यात आतापर्यंत १७१ शेतकरी उत्पादक कंपन्यांची स्थापना करण्यात आली आहे. आता स्मार्टअंतर्गत नव्याने कंपन्यांची स्थापना सुरू असून या महिनाअखेरपर्यंत उत्पादक कंपन्यांची नोंद केली जाणार असल्याने यात आणखी वाढ होऊ शकते.

 

आतापर्यंत जिल्ह्यात १७१ शेतकरी उत्पादक कंपन्यांची स्थापना करण्यात आली आहे. यापैकी शंभराहून अधिक ११३ कंपन्या चांगल्या प्रकारे सुरू आहेत. औरंगाबाद तालुक्यात ४६, पैठण तालूक्यात १३, फुलंब्री तालूक्यात १३, वैजापुर तालूक्यात १४, गंगापुर तालूक्यात ९, खुलताबाद तालूक्यात १४, सिल्लोड तालूक्यात २५, कन्नड तालूक्यात ३३ तर सोयगाव तालूक्यात ४ उत्पादक कंपन्या कार्यरत आहेत.

सर्वाधिक शेतकरी उत्पादक कंपन्या कन्नडमथ्ये सुरू आहेत यापैकी काही उत्पादक कंपन्यांनी चांगल्याच यशस्वी झाल्या आहेत. रेशीमशेती, गुळ उत्पादक, दुग्धोत्पादन, गांडूळखत, दालमिल, फळे व भाजीपाला प्रक्रिया, पशुखाद्य व दुध उत्पादन, आटा प्रोसेसिंग, धान्य, मका स्वच्छता आणि ग्रेडींग, सितफळ, भाजीपाला व केळी प्रक्रिया करण्याचे काम या उत्पादक कंपन्यांमार्फत केले जात असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले.

 

ऑनलाईन नोंदणीचे आवाहन
जागतिक बॅकेच्या अर्थ सहाय्यातुन महाराष्ट्र राज्यात राबवण्यात येत असलेल्या बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पांतर्गत समुदाय आधारीत संस्था आणि संस्थात्मक खरेदीदार यांच्याकडून ऑनलाईन अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या समुदाय आधारीत संस्थांनी मुल्यसाखळी विकासाचे उपप्रकल्प ऑनलाईन सादर करावयाचे आहेत.

याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. तथापि शेतकऱ्यांची आणि खरेदीदार संस्थांची मागणी लक्षात घेवुन अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात येत आहे, अशी माहिती स्मार्टचे प्रकल्प संचालक तथा राज्याचे कृषि आयुक्त, धीरज कुमार यांनी दिली आहे. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी व अधिक माहितीसाठी www.smart-mh.org या संकेतस्थळास भेट द्यावी, असे येथील आत्मा कार्यालयाच्यावतीने आवाहन करण्यात आले आहे.

 

Edited - Ganesh Pitekar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Under Atma Above Hundred Farm Producing Companies In Aurangabad Diestrict