सरोगसी मदर गायीने दिला ‘अलेक्सा’ला जन्म 

मधुकर कांबळे  
Friday, 3 July 2020

आईचे दूध अमृत. आईच्या दूधातुन जे घटक मिळतात तेच घटक देशी गायीच्या दूधातून मिळतात. गीर, लालकंधारी, थारपारकर, सइवाल, देवणी या देशी गायी. यातील देवणी आणि लाल कंधारी जातीच्या गायीकडून दुधाबरोबरच शेतीकामासाठी उत्तम दर्जाचे वळू मिळायचे मात्र. मात्र, या गायी कमी दूध देतात. यामुळे देशी गायी पाळणे कमी झाले

औरंगाबाद : सरोगसी मदर ही संकल्पना मानवात वापरली जाते. हीच संकल्पना जनावरांमध्येदेखील वापरता येते. एका वेतात तब्बल चार हजार लिटर दूध देण्याची क्षमता असलेल्या गोदावरीचे आणि तेवढेच दूध देण्याची वंशवृद्धी करण्याची क्षमता असणाऱ्या विवेकचे बिजांड एकत्र करून त्याची प्रयोगशाळेत वाढ करण्यात आली. त्यानंतर हे बिजांड कमी दूध देणाऱ्या देशी गोमतीच्या गर्भात वाढवण्यात आले.

आता या गोमतीने पाच दिवसांपूर्वी कालवडीला जन्म दिला आहे. तिचे अलेक्सा असे नामकरण करण्यात आले असून, हीच कालवड मोठी होऊन एका वेतात चार हजार लिटर दूध देणारी ठरेल. मराठावाड्यात असा पहिलाच प्रयोग असून पशुपालकांना हा प्रयोग वरदान ठरणारा आहे. 

आईचे दूध अमृत. आईच्या दूधातुन जे घटक मिळतात तेच घटक देशी गायीच्या दूधातून मिळतात. गीर, लालकंधारी, थारपारकर, सइवाल, देवणी या देशी गायी. यातील देवणी आणि लाल कंधारी जातीच्या गायीकडून दुधाबरोबरच शेतीकामासाठी उत्तम दर्जाचे वळू मिळायचे मात्र. मात्र, या गायी कमी दूध देतात.

यामुळे देशी गायी पाळणे कमी झाले आणि जास्त दूध देणाऱ्या जर्सी, एच. एफ. संकरीत गायी पाळल्या जात असल्याने या संकरित गायींचे दूध पिण्याची सर्वांवर आली आहे. मात्र, आईच्या दुधाला जेवढे न्युट्रीशियन मूल्य असते तेवढेच देशी गायीच्या दूधात असतात. ए-२ नावाचे अतिशय मौल्यवान प्रोटीन देशी गायींच्या दुधात असते. परंतु, आज देशी गायींचा वंशच धोक्यात आला आहे. 

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

आई-वडील पुण्याजवळ; जन्म सुलतानपुरात 

औरंगाबादेतील खुलताबाद तालुक्यातील सुलतानपूर येथे पाच दिवसांपूर्वी जन्म झालेल्या अलेक्सा कालवडीचे आई-वडील पुण्याजवळील शिरूर येथे आहेत. मात्र, अलेक्साचा जन्म झाला सुलतानपूर येथील श्री भद्रा डेअरी फार्ममध्ये. अलेक्साची आई गोदावरी ही गाय एका वेतात ४ हजार लिटर दूध देते; तर एका वेतात ४ हजार ८०० लिटर दूध देणाऱ्या वंशावळीतील विवेक नावाचा वळूचे बिजांड एकत्र करून ते शिरूर येथील जे. के. ट्रस्टच्या प्रयोगशाळेत वाढवण्यात आले.

दोन महिन्यांचे झाल्यानंतर ते बिजांड दिले सुलतानपूर येथील श्री भद्रा डेअरी फार्ममधील एका वेतात १००० ते १२०० लिटर दूध देणाऱ्या गोमती नावाच्या गीर जातीच्या गायीत सरोगसी पद्धतीने कृत्रिम रेतनाद्वारे वर्षभरापुर्वी सोडण्यात आले होते. पाच दिवसांपूर्वी गोमतीने कालवडीला जन्म दिला असून, तिचे नाव अलेक्सा ठेवण्यात आले आहे. या आयव्हीएफ ( इन व्हिट्रो फर्टिलायजेशन) तंत्रज्ञानाने उच्च दूध देण्याची क्षमता असलेल्या उच्च वंशावळीचा वंश वाढवता येऊ शकतो. 

आयव्हीएफ तंत्रज्ञान शेतकऱ्याना फायदेशीर 

भद्रा डेअरी वैशाली पाटील चव्हाण व संजय मालोदे चालवतात. त्यांच्या गोठ्यात ५० मोठ्या गायी तर २५ कालवडी आहेत. आता अलेक्साची भर पडली आहे. वैशाली पाटील यांनी सांगितले, दुधाचे उत्पादन वाढावे, शुद्ध देशी गायीची संख्या वाढावी यासाठी रेमंड समुहाचे गौतम सिंघानिया यांच्या जे. के. ट्रस्टच्या माध्यामातून श्री भद्रा डेअरी फर्ममधील सहा गायीना हे आयव्हीएफ तंत्रज्ञानाद्वारे बिजांड देण्यात आले आहे.

जे. के. बोवाजेनिक्सचे शास्त्रज्ञ डॉ. श्याम झंवर तसेच डॉ. विनोद पाटील, जिल्हा परिषदेचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. डी. एस. कांबळे, डॉ. आजीनाथ जाधव, डॉ. बी. बी. चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली हे तंत्रज्ञान वापरण्यात येत आहे.

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

...तर शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ येणार नाही 

डेअरी फार्मच्या संचालिका वैशाली पाटील म्हणाल्या, या तंत्रज्ञानासाठी २५ हजार रुपयांपर्यंत किमान खर्च येतो. मात्र, या तंत्रज्ञानातून जन्माला येणारी कालवड जेव्हा दूध देईल तेव्हा एका वेतात ४ हजार लिटर म्हणजे रोज २५ ते ३० लिटर दूध देऊ शकते. अलेक्साचे दूध मिळण्यासाठी अडीच ते पावनेतीन वर्ष लागतील. शेतकऱ्यांनी अशा गायींची शेतीला जोड दिली तर आत्महत्या करण्याची वेळ येणार नाही.

आमच्या फार्मच्या देशी गायीच्या दुधाला प्रति लिटर ८० रुपये भाव मिळतो. मानवी स्पर्शरहित, भेसळरहित दूध बाटलीबंद करून शहरात पाठवतो. शेतकऱ्यांनी दहा गायी सांभाळण्यापेक्षा या तंत्रज्ञानातून जन्मलेल्या दोन गायी पाळून शेतीला दुग्धपालनाची जोड दिली तर उत्पादन वाढेल व त्यांच्यावर आत्महत्याची वेळ येणार नाही. कोणत्या शेतकऱ्यांनी, पशुपालकांना यासाठी आम्ही मोफत मार्गदर्शन करू असेही त्यांनी सांगीतले. 

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Using IVF Technology, Cows Gave Birth Calf Aurangabad News