गर्दीवर इलाज...!शहरात दीडशे ठिकाणी भाजीमार्केट

भाजी बाजार
भाजी बाजार

औरंगाबाद - वारंवार आवाहन करूनही जाधववाडी येथे भाजी खरेदीसाठी नागरिक गर्दी करत आहेत. याठिकाणी सोशल डिस्टन्सिंगदेखील पाळले जात नसल्यामुळे कोरोनाचा धोका वाढला आहे. म्हणून शहरातील प्रमुख सहा ठिकाणांसह १५० खुल्या जागांवर भाजीपाला विक्री करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी घेतला आहे. 

म्हणून घेतला निर्णय
शहरात कोरोनाचा धोका वाढत असला तरी नागरिक मात्र लॉकडाऊनला गंभीरपणे घेण्यास तयार नसल्याचे चित्र आहे. भाजीपाला, किराणा २४ तास उघडा ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र वारंवार आवाहन करूनही जाधववाडी नवा मोंढा येथील भाजीमंडईत होलसेल व किरकोळ विक्रेते, सोबतच नागरिकही भाजीपाला खरेदीसाठी गर्दी करत आहेत. त्यामुळे किरकोळ विक्रेते व ग्राहकांना आंबेडकरनगर परिसरात सर्व्हिस रोडवर जागा उपलब्ध करून देण्यात आली. मात्र याठिकाणीही गर्दी करण्यात आली. त्यामुळे पुन्हा मंडई हलविण्यात आली. याठिकाणीदेखील मोठी गर्दी असल्यामुळे नागरिकांना शिस्त लावावी तरी कशी, असा प्रश्‍न प्रशासनासमोर होता. दरम्यान, आयुक्तांनी तोडगा काढला आहे. 

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

काय म्हणाले आयुक्त?
फेसबुक व ट्विटरवर संवाद साधताना आयुक्‍त आस्तिककुमार पांडेय म्हणाले, की नागरिकांनी घराबाहेर पडू नये. भाजीपाल्यासाठी १५० ठिकाणी भाजीमार्केट सुरू केले जाईल. जाधववाडीतील वाढती गर्दी रोखण्यासाठी हा पर्याय निवडला असून, आमखास मैदान, छावणी मैदान, हर्सूल जेलसमोरील मैदान, चिकलठाणा एमआयडीसी जळगाव मार्गावरील सर्व्हिस रोड, बीड बायपास रोडवरील जबिंदा लॉन्स मैदान, शहानूरमिया दर्गा आठवडे बाजार या सहा प्रमुख ठिकाणांसह जाधववाडी आणि शहरातील १५० खुल्या जागांवर भाजीपाला दुकाने हलविणार असल्याचे आयुक्‍तांनी स्पष्ट केले. लॉकडाऊनमध्ये ९५ टक्के लोक घरातच राहत आहेत; मात्र पाच टक्के लोक वारंवार घराबाहेर पडत आहेत. अशांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन करत आयुक्‍तांनी एकदाच चार दिवसांचा भाजीपाला खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. 

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

जाधववाडीत ठोक स्वरूपातच खरेदी-विक्री 
जाधववाडीतील भाजीपाला बाजारात होत असलेली गर्दी रोखण्याच्या अनुषंगाने जाधववाडीत फळे व भाजीपाला बाजारात केवळ ठोक स्वरुपात खरेदी-विक्री होईल. याबाबत महापालिका आयुक्त, बाजार समिती व पोलिसांनी आवश्यक ती कार्यवाही पार पाडण्याचे बैठकीत ठरले. यासंदर्भात विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या बैठकीला विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी उदय चौधरी, मनपा आयुक्त अस्तिककुमार पांडेय, अपर आयुक्त विजयकुमार फड, सहकार उपनिबंधक अनिलकुमार दाबशेडे, बाजार समितीचे सचिव उपस्थित होते. जाधववाडी येथे कोणत्याही परीस्थितीत फळे व भाजीपाला ठोक स्वरूपात खरेदी-विक्री व्यतिरिक्त किरकोळ खरेदी-विक्री होणार नाही याची दक्षता बाजार समितीने घ्यावी. महापालिका, पोलिसांनी विक्रेते व ग्राहकांना याबाबत माहिती द्यावी. बाजार समितीने फलक लावावेत, असेही बैठकीत ठरले. 
 

या ठिकाणी भरणार भाजीमार्केट 

  • आमखास मैदान : २५० दुकाने 
  • छावणी मैदान : २०० दुकाने 
  • हर्सूल जेलसमोरील खुले मैदान : ४०० दुकाने 
  • सिडको स्थानक जळगाव सर्व्हिस रोड : ५०० दुकाने 
  • बीड बायपास जबिंदा लॉन्स : २०० दुकाने 
  • जाधववाडी मंडई रोड : ३०० दुकाने 
  • महापालिकेच्या १५० खुल्या जागा : एक हजार दुकाने 
     

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com