
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (अभाविप) वतीने विविध मागण्यांसाठी सोमवारी (ता.३१) धडक मोर्चा काढण्यात आला.
औरंगाबाद : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (अभाविप) वतीने विविध मागण्यांसाठी सोमवारी (ता.३१) धडक मोर्चा काढण्यात आला. यावेळी मागण्यांचे निवेदन कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांना देण्यात आला. निवेदनात म्हटले आहे, की अंतिम वर्ष परीक्षासंदर्भात ठाकरे सरकार व मंत्री उदय सामंत हे सर्वोच्च न्यायालयात तोंडावर पडले आहेत.
राज्य सरकारने राज्यातील विद्यार्थ्यांचे भविष्यासोबत खेळ चालवला आहे. यामुळे अभाविप उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा इशारा अभाविपचे प्रदेश मंत्री स्वप्नील बेगडे यांनी दिला आहे. अंतिम वर्ष परीक्षासंदर्भात उदय सामंत विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण करत आहेत. विद्यार्थ्यांचे आरोग्य हित लक्षात घेता विद्यापीठ अनुदान आयोगाने सुचविलेल्या परीक्षा पद्धतीने परीक्षा येत्या काळात घेण्यात याव्यात.
ट्रक-कारच्या अपघातात एक जखमी, धुळे-सोलापूर महामार्गावरील घटना
प्रथम व द्वितीय अभियांत्रिकीच्या तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क विद्यार्थ्यांना परत करावे, राज्यातील सर्व महाविद्यालय, अभिमत विद्यापीठे, खासगी विद्यापीठे तसेच शासकीय विद्यापीठांचे ३० टक्के शैक्षणिक शुल्क राज्य सरकारने माफ करावे. चुकीच्या लागलेले निकालांचे तत्काळ पुनर्मूल्यांकन करावे, खासगी विद्यापीठाच्या शुल्कावर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्य सरकारने कायदा करावा किंवा खासगी विद्यापीठे शुल्क निर्धारित समितीच्या अंतर्गत घेण्यात यावी. राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी निवडणुकांमध्ये आपल्या आवेदनपत्र दरवेळी वेगवेगळी शैक्षणिक अहर्ता दर्शवली आहे.
त्यामुळे श्री. सत्तार यांनी निवडणूक आयोग व जनतेची दिशाभूल केली आहे. याविरोधात अभाविपने जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली आहे. जर अब्दुल सत्तार यांना जिल्हाधिकारी यांनी अपात्र ठरवले नाही तर राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहे. यावेळी प्रदेश सहमंत्री अंकिता पवार, जालना शहरमंत्री अनिकेत शेळके, महानगर मंत्री तुषार साळुंखे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
(संपादन - गणेश पिटेकर)