भाजपच्या राष्ट्रीय सचिवपदी औरंगाबादच्या विजया रहाटकर यांची निवड

माधव इतबारे
Saturday, 26 September 2020

भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिवपदी विजया रहाटकर यांची निवड झाली आहे.

औरंगाबाद : भारती जनता पक्षाच्या राष्ट्रीय महिला मोर्चाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांना राष्ट्रीय सचिवपदी बढती मिळाली आहे. शनिवारी (ता.२६) भाजपची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर झाली. त्‍यात भाजपच्या दिल्लीत वरिष्ठ नेत्यांनी रहाटकर यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखविला आहे. शहराच्या माजी महापौर असलेल्या विजया राहटकर यांनी राष्ट्रीय राजकारणात आपला ठसा उमटविला आहे.

भारतीय जनता युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत असताना २००० च्या महापालिका निवडणुकीत रहाटकर नगरसेवक झाल्या. त्यांची २००७ मध्ये औरंगाबादच्या महापौरपदी वर्णी लागली. त्यानंतर रहाटकर यांना थेट राष्ट्रीय कार्यकारिणीत काम करण्याची संधी मिळाली. राष्ट्रीय महिला मोर्चाच्या सहचिटणीसपदाची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली.

कृषीमंत्री भुसे नागद शिवारातील शेतकऱ्यांच्या बांधावर, म्हणाले प्रत्येकाला मदत...

भाजप राष्ट्रीय महिला मोर्चाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी रहाटकर यांच्यावर सोपविण्यात आली होती. तसेच राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी त्यांची निवड तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. महिला आयोगाचे अध्यक्षपद स्वीकारले तेव्हा राज्यातील पाच हजार ५०० प्रकरणे आयोगाकडे प्रलंबित होते. प्रलंबित प्रकरणे निकाली काढत रहाटकर यांनी ‘महिला आयोग आपल्या दारी‘ ही योजना सहा विभागात राबवली. महिला आयोग प्रत्येक जिल्ह्यात नेण्याचाही प्रयत्न रहाटकरांनी केला. या कामाची दखल घेत त्यांना पुन्हा राष्ट्रीय कार्यकारिणीत काम करण्याची संधी दिली.

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vijaya Rahatkar Elected As BJP National Secreatary Aurangabad News