मांडा पाण्याचा ताळेबंद , पीकपद्धतीत बदलाची गरज 

मधुकर कांबळे  
Monday, 8 June 2020

पाण्याचा ताळेबंद केवळ पाणलोटाशी संबंधित नाही, तर निसर्गाचे व कीड रोगांचे संतुलन राखणारी, ग्रामीण अर्थव्यवस्थेला वेगळे वळण देण्याचा विषय आहे.

औरंगाबाद : कोरोना महामारीमुळे रोजगाराच्या शोधात गावे सोडून गेलेले लोक कित्येक वर्षांनंतर गावी परतले आहेत. आता प्रश्‍न निर्माण होईल तो त्यांना गावातल्या गावात रोजगार मिळण्याचा. यासाठी गावातच प्रक्रिया होईल, रोजगारनिर्मिती होईल. निसर्गाचेही संतुलन चांगले राहील, यासाठी पाण्याचा ताळेबंद मांडून उपलब्ध पाणी आणि आपल्या भूप्रदेशाशी सुसंगत पिकांची लागवड करण्याची गरज निर्माण झाली आहे, असे कृषी अधिकारी उदय देवळाणकर म्हणाले. 

धरणे झाल्याने सिंचनाची सोय झाली आणि बागायतीचे क्षेत्र वाढत गेले. पारंपरिक पिके बाजूला पडली आणि शेतकरी नगदी पिकांकडे वळले आहेत. यासाठी महागडी खते, बियाणांचा वापर सुरू झाला. शेतीचा खर्च वाढत गेला आणि शेतकरी अधिकाधिक कर्जात बुडत गेला आहे. या पार्श्‍वभूमीवर देवळाणकर यांनी कन्नड तालुक्यात असताना पहिल्यांदा तिथे पाण्याचा ताळेबंदची (वॉटर बजेटिंग) संकल्पना राबविली. या पाण्याच्या ताळेबंदाविषयी त्यांनी सांगितले, की पाण्याचा ताळेबंद केवळ पाणलोटाशी संबंधित नाही, तर निसर्गाचे व कीड रोगांचे संतुलन राखणारी, ग्रामीण अर्थव्यवस्थेला वेगळे वळण देण्याचा विषय आहे.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

आपल्या भागात किती पाऊस पडतो, जमिनीची हेक्टरी जलधारण क्षमता किती आहे, बाष्पीभवन होऊन पाणी किती उडून जाते, जनावरांसाठी, औद्योगिक कारणांसाठी, पिण्यासाठी व इतर कारणांसाठी किती पाण्याची गरज आहे आणि पाण्याच्या उपलब्धतेनुसार कोणती पिके घ्यायची याचा ताळमेळ बसविण्याचे काम यात करावे लागते. पाण्याचा ताळेबंद मांडून शेती करणे काळाची गरज बनली असल्याचे मतही श्री. देवळाणकर यांनी व्यक्त केले. 

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

अन्नधान्य देणारी पिके २० टक्के , तेलबिया पिके २० टक्के, डाळवर्गीय पिके २० टक्के , चारा पिके १० टक्के आणि नगदी पिके ३० टक्के असे शेतीत लागवड करण्याचे प्रमाण असले पाहिजे असेही श्री देवळाणकर यांनी सांगीतले.

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा

पाण्याच्या ताळेबंदासाठी करावे लागेल 

  •  गावाने एकत्र येऊन पाण्याचा ताळेबंद मांडावा 
  •  गावशिवारात किती पाऊस पडतो, कोणत्या पिकांना किती पाणी लागेल, खरीप, रब्बी, उन्हाळी, बारमाही पिकांसाठी, जनावरांसाठी आणि इतर बाबींसाठी किती पाणी लागेल आणि आपल्या गावशिवारात किती पाणी उपलब्ध होईल त्यानुसार पिकांची लागवड करावी. 
  •  कमी पाण्यावर आणि कमी खर्चामध्ये येणाऱ्या पीक लागवडीवर भर द्यावा. 
  •  गावातच प्रक्रिया करता येईल अशा पिकांची निवड करावी. 
  •  लोकांना गावातच रोजगार मिळेल असे प्रक्रिया उद्योग सुरू करावेत. 
  •  

     

     


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Water Budgeting And crop pattern Aurangabad News