
लॉकडाऊनमुळे शहरात तब्बल १२५ जण अडकून पडले आहेत. त्यांची राहण्याची व्यवस्था महापालिकेच्या शाळांमध्ये करण्यात आली आहे. आता तीन मेपर्यंत लॉकडाऊन वाढल्यामुळे पुनर्वसन केंद्रात रडारड सुरू झाली असून, प्रत्येकजण आम्हाला घरी कधी सोडणार, असा प्रश्न करून अधिकाऱ्यांना भंडावून सोडत असल्याचे चित्र आहे.
औरंगाबाद - लॉकडाऊन मंगळवारी (ता. १४) संपल्यानंतर बुधवारी (ता. १५) आपल्या घरी जाऊ, या आशेवर निर्वासित केंद्रातील कामगार, मजूर होते; मात्र आता तीन मेपर्यंत लॉकडाऊन वाढल्यामुळे पुनर्वसन केंद्रात रडारड सुरू झाली असून, प्रत्येकजण आम्हाला घरी कधी सोडणार, असा प्रश्न करून अधिकाऱ्यांना भंडावून सोडत असल्याचे चित्र आहे. कामगार, मजुरांची समजूत काढताना मात्र प्रशासनाच्या नाकीनऊ येत आहे.
हेही वाचा - औरंगाबादेत सतरा वर्षीय मुलगा पॉझिटीव्ह, संख्या पंचवीसवर
सव्वाशे नागरिक अडकलेले
लॉकडाऊनमुळे शहरात तब्बल १२५ जण अडकून पडले आहेत. त्यांची राहण्याची व्यवस्था महापालिकेच्या शाळांमध्ये करण्यात आली आहे. यात काहीजण घरातील कर्ते पुरुष आहेत. तर काहीजण १८ ते २० वयोगटांतील तरुण आहेत. महिला, लहान मुलांचाही समावेश आहे. अडकून पडलेल्या कामगार, मजुरांच्या घरून वारंवार फोन येत असून, तुम्ही कधी येणार, अशी विचारणा केली जात आहे. त्यावर १४ तारखेपर्यंत लॉकडाऊन आहे, त्यानंतर सर्वांना घरी पाठविले जाण्याची शक्यता असल्याची समजूत अधिकाऱ्यांनी काढली; मात्र मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊन तीन मेपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला. यावेळी अडकून पडलेल्या नागरिकांबद्दल त्यांनी कुठलीही सूचना दिली नाही. त्यामुळे पुनर्वसन केंद्रात अडकून पडलेल्या नागरिकांची धाकधूक वाढली आहे.
औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा
त्यांचे मन रमावे म्हणून...
मंगळवारी येथील नागरिक, महिलांनी काहीही करा; पण आम्हाला घरी जाऊ द्या, अशी गळ महापालिकेच्या सहायक आयुक्त विजया घाडगे यांना घातली. यावेळी अनेकांना रडूही कोसळले. काही तरी मार्ग निघेल, तुम्ही चिंता करू नका, असे सांगत त्यांनी समजूत काढली. नागरिक ऐकण्याच्या स्थितीत नसल्याचे तहसीलदारांना कळविण्यात आले असून, ते भेट देणार असल्याचे विजया घाडगे यांनी सांगितले. दरम्यान, या नागरिकांचे मन रमावे यासाठी संगीत-खुर्ची, पळण्याची स्पर्धा, योगावर्ग घेतले जात आहेत. मनोरंजनासाठी साधने देण्यात आली आहेत.
आणखी २४ जण वाढले
निर्वासित केंद्रात अडकून पडलेल्यांची संख्या २४ ने वाढली आहे. सोमवारी (ता. १३) रात्री जालन्याकडे जाणाऱ्या २४ जणांना पोलिसांनी पकडले होते. त्यांना आता सिडको एन- सात येथील शाळेत ठेवण्यात आले आहे. त्यात एक सहा महिन्यांचे बाळ असलेली महिलादेखील आहे.