गव्हाच्या पिकावर आळीचा प्रार्दुभाव; पाहणी मात्र रजापुरला, शेतकरी संतप्त

शेख मुनाफ
Thursday, 10 December 2020

गहु पिक बऱ्यापैकी उगल्यानंतर ऐन बहरात असताना ती पिके पिवळी पडण्यास सुरवात झाली.

आडुळ (जि.औरंगाबाद) : कृषी विभागाचे पथक आले, शासकिय एका रोपवाटिकेची पाहणी  करुन एकाच शेतकऱ्याला मार्गदर्शन केले. त्याच रोपवाटिकेच्या बाजुला गव्हाचे शेत असल्याचे पाहुण त्यात उभे राहिले फोटो काढले आणि निघुन गेले, अशी शेतकऱ्यांची चेष्टा करण्याचा प्रताप रजापूर (ता.पैठण) येथे पैठण तालुका कृषी विभागाने मंगळवारी (ता.आठ) केला. यामुळे आडुळ मंडळातील शेतकरी तालुका कृषी विभागाविरुद्ध संताप व्यक्त करित आहेत.

यंदा समाधानकारक पाऊस असल्याने विहिरींना मुबलक पाणी असल्याने व कपाशी पिकांना अतिवृष्टीचा फटका बसल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी यंदा कपाशी उपटुन त्याच्या जागी गहु, हरबऱ्याची पेरणी केल्याने गेल्या पंधरा वर्षानंतर प्रथमच मंडळात मोठ्या प्रमाणात गव्हाची पेरणी झाली आहे. गहु पिक बऱ्यापैकी उगल्यानंतर ऐन बहरात असताना ती पिके पिवळी पडण्यास सुरवात झाली.

रजापूर, पाचोड व बालानगर येथे गहू व मोसंबी पिकांची पाहणी केली. उपस्थित असलेल्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
- डॉ. किशोर झाडे, शास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, औरंगाबाद

त्यामुळे शेतकऱ्यांनी वेळोवेळी कृषी सहायकापासून ते तालुका कृषी अधिकारीपर्यंत याबाबत पिक पाहणी करुन मार्गदर्शन करण्याची मागणी केली. मात्र झाले उलटेच मंगळवारी कृषी विज्ञान केंद्र औरंगाबादचे शास्त्रज्ञ डॉ.किशोर झाडे, तालुका कृषी अधिकारी संदीप शिरसाट, कृषी पर्यवेक्षक मिर्झा हे रजापुर येथील एका शासकिय रोपवाटिकेची पाहणी करण्यासाठी आले असता त्यांच्या असे लक्षात आले की जवळच शेतात गव्हाचे पिक उभे आहे. लागलीच त्यांनी त्या पिकात उभे राहून छायाचित्रे घेतले व या छायाचित्रांमध्ये शेतकऱ्याला मार्गदर्शन करत आहे असे दाखवले.

परंतु वस्तुस्थिती ही वेगळीच आहे. ज्या शेतकऱ्यांच्या  शेतात तालुका कृषी अधिकाऱ्‍यांसह वरिष्ठ अधिकारी हे पाहणी करण्यासाठी गेले होते. प्रत्यक्ष मात्र त्यांनी या शेतकऱ्यांच्या शेतात असलेल्या शासकीय रोपवाटिकेत तयार केलेल्या मोसंबीच्या कलमाची पाहणी करून त्यांना त्या एकाच शेतकऱ्याला मार्गदर्शन केले. त्यामुळे लग्नात मागून वरात या शब्दाला अनुरूप असे काम करणारा विभाग म्हणजे पैठण तालुका कृषी विभाग आहे असे यावरून दिसून येते.

आमच्या गव्हाच्या पिकावर आळी पडली असुन गहु पिवळे पडत आहे. या संबधी कृषी  सहायक, मंडळ अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांना कल्पना देऊन देखील ते देवगाव येथे फिरकले नाही.
- भास्कर गीते, शेतकरी देवगाव

नेहमी पैठण तालुका कृषी विभागातील अधिकारी हे आडुळ परिसरातील गावातील एक किंवा दोन शेतकरी व चार-पाच अधिकारी पिकांवर होणारे रोग व व्यवस्थापन याविषयी कार्यक्रम घेत असतात. बाकी गावातील शेतकऱ्यांना याची कल्पनासुद्धा मिळत नाही. देवगाव येथील शेतकऱ्यांना  कृषि विभागाचे मार्गदर्शन मिळावे म्हणून कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांची आतुरतेने वाट बघणारे शेतकरी आज कृषी विभागाने केलेल्या या कामामुळे संताप व्यक्त करीत आहे. विशेष म्हणजे तालुका कृषी अधिकारी सांगतात गव्हाच्या पिकांची पाहणी केली तर मंडळ कृषि अधिकारी सांगतात मोसंबी पीक  पाहणी करून बोर्डो पेस्ट तयार करून वापराबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. शास्त्रज्ञ सांगतात गहु आणि मोसंबी दोन्ही पिका संदर्भात मार्गदर्शन केले.

(edited by- pramod sarawale)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: wheat crop got worm infection inspection was conducted at Razapur