संचमान्यतेपेक्षा जास्त विद्यार्थी आले कुठून? परीक्षा मंडळासमोर प्रश्न

संदीप लांडगे
शुक्रवार, 31 जानेवारी 2020

दहावी, बारावीच्या परीक्षेसाठी संचमान्यतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांचे आवेदन पत्र शाळा, महाविद्यालयाकडून सादर करण्यात आले आहेत. दरवर्षी एेन परीक्षेच्या काळात विद्यार्थी संख्या वाढते कशी हा प्रश्न मंडळालाच पडला आहे

औरंगाबाद- संचमान्यतेवर नोंद असलेल्या विद्यार्थ्यांचेच आवेदनपत्र स्वीकारले जाणार असल्याचे आदेश मंडळाने दिले होते. त्यानंतरही औरंगाबाद विभागातील अनेक शाळा, महाविद्यालयांतून क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे भरण्यात आली आहेत. ऐन परीक्षेच्या तोंडावर विद्यार्थ्यांची संख्या कशी वाढते? असा सवाल आज खुद्द विभागीय शिक्षण मंडळाच पडला आहे. त्यावर विभागीय शिक्षण मंडळाने शिक्षण विभागाला यावर लक्ष देण्यास तसेच विद्यार्थी संख्या वाढली कशी? याची माहिती देण्यास सांगितले आहे. 

 

येत्या 18 फेब्रुवारीला बारावी परीक्षेला सुरुवात होत आहे. या परीक्षेसाठी औरंगाबाद विभागातील जालना, बीड, परभणी, हिंगोली, औरंगाबाद या पाच जिल्ह्यांतून एक लाख 71 हजार 959 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. तर तीन मार्चपासून सुरू होणाऱ्या दहावीच्या परीक्षेसाठी विभागातून दोन लाख एक हजार 572 विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत. परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना केंद्र देताना अनेक तांत्रिक गोष्टी समोर येत आहे. 

हे ही वाचा -  शाळांच्या अनुदानाची वाट मोकळी  

दरवर्षी शाळा, महाविद्यालये सुरु झाल्यानंतर एसएससी बोर्डाकडून संचमान्यतेवर नोंद केलेल्या सर्व विद्यार्थ्यांची यादी मागवली जाते. त्यानुसार बोर्डाकडून परीक्षेसंदर्भात, केंद्राबाबत नियोजन केले जाते. परंतू, ज्यावेळी परीक्षा मंडळाकडून आवेदनपत्र भरण्याच्या सूचना दिल्या जातात. त्यावेळी शाळांकडून संचमान्यतेवर नोंद केलेल्या विद्यार्थी संख्येपेक्षा जास्त विद्यार्थ्यांचे आवेदनपत्र भरुन पाठवले जातात. 
परीक्षेच्या काळातच विद्यार्थ्यांचा फुगवटा आकडा येतो कुठून? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. 

वाचा कसा -  दहावी-बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीत हलगर्जीपणा  

गेल्या दोन वर्षात परीक्षेच्या वेळी दिसणारी विद्यार्थी संख्या पाहता पुणे-मुंबई सारख्या ठिकाणाहूनही औरंगाबादमध्ये विद्यार्थी परीक्षेसाठी येत असल्याचे आढळले आहे. यावर शिक्षण विभागास किती संस्थांनी क्षमतेपेक्षा जास्त प्रवेश दिले आहेत, याची माहिती शिक्षण उपसंचालक कार्यालयास मागितली होती. पण आता दोन वर्ष उलटली तरीही विद्यार्थी संख्या शिक्षण विभागाने बोर्डास दिली नसल्याचे सूत्रांनी सांगितले. यावर पुन्हा आता परीक्षेच्या तोंडावर संचमान्यतेत एक आणि प्रत्यक्षात एक असलेली विद्यार्थी आली कशी असा सवाल शिक्षण विभागास बोर्डाने केला आहे. आपण याची माहिती घेत असल्याचे विभागीय सचिव सुगता पुन्ने यांनी दिली. 

पहा -  "परीक्षेला सामोरे जाताना...video  

संचमान्यतेबाबत प्रश्‍नचिन्ह 
प्रत्येक शाळा, महाविद्यालयांनी संचमान्यतेनुसार आवेदनपत्रे भरून द्यावीत असे मंडळामार्फत कळवण्यात आले होते. तरीही अनेक शाळा, महाविद्यालयांनी परीक्षा तोंडावर आली असताना जास्तीचे आवेदनपत्र भरून दिले. विद्यार्थीसंख्येत अचानक कशी वाढ झाली, हा प्रश्‍न मंडळाला पडला आहे. म्हणून जिल्ह्याच्या शिक्षणाधिकाऱ्यांना याबाबत पत्रे देण्यात आली आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Where did more students come for the exam?