अक्षयतृतीयेपासूनच का खाल्ला जातो आंबा 

मधुकर कांबळे  
Sunday, 26 April 2020

आंबा खूप गोड आणि रसाळ असेल तो चांगला आंबा. नैसर्गिकरित्या पिकवलेल्या आंब्याचा आजूबाजूला घमघमाट सुटतो.

औरंगाबाद - अक्षयतृतीयेच्या दिवशी आमरस पोळी केली जाते. अक्षयतृतीयेला घरोघरी हमखास आंबे आणले जातात. अक्षयतृतीयेपासूनच आंबे का खायला सुरुवात होते असा कोणाला फारसा प्रश्‍न पडत नाही , कारण आंबे खाण्याशी मतलब कोय कोण मोजतं असंच म्हणावं लागेल. यंदाच्या अक्षयतृतीयेला आंब्याची मोठी मागणी असली तरी त्याची उपलब्धता मात्र नाही. आंब्याला फळांचा राजा म्हणतो तसा गोडवा असलेला रसाळ आंबा मात्र अद्याप बाजारात आलेला नाही. 

अक्षय तृतीयेला ग्रामीण भागात कुठे आखाजी तर कुठे आकीदी म्हणतात. या दिवसापासून पितरंपुजनाची सुरुवात होते. मराठवाड्यात १९ हजार ३१७ हेक्टर इतके आंब्याचे लागवड क्षेत्र आहे. यात सर्वाधिक क्षेत्र उस्मानाबाद जिल्ह्यात ४ हजार २१६ हेक्टर, त्याखालोखाल बीड जिल्ह्यात ४ हजार २०० तर औरंगाबाद जिल्ह्यात ३ हजार ८८२ हेक्टर इतके क्षेत्र असल्याचे फळसंशोधक डॉ. भगवानराव कापसे यांनी सांगितले. 

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

पितरांना अर्पण करूनच सुरुवात 

आंबा खाण्यासाठी अक्षय तृतीयेपासूनच का सुरुवात होते याविषयी ग्रामविकास संस्थेचे फलोत्पादनतज्ञ सुनील कांबळे म्हणाले, ग्राम्य संस्कृतीमध्ये आंबा उतरवून तो पिकवल्यानंतर आधी तो पितरांना म्हणजे आपल्या वाडवडिलांना अर्पण केले जाते. त्यानंतर घरातील सदस्य ते फळ खातात. अक्षयतृतीयेपासून पितरांना जेऊ घालण्याला सुरुवात होत असते यासाठी अक्षयतृतीयेपासून आंबा खाण्याची प्रथा आहे.

फळबागतज्ज्ञ व गटशेतीचे प्रणेते डॉ. भगवानराव कापसे यांनी सांगितले, आंब्याला आम्रफळ, फळांचा राजा म्हणतात तो त्याच्या रसाळपणामुळे, त्याच्यातील गोडव्यामुळे. अक्षयतृतीयेला जो आंबा खाण्यायोग्य व्हायचा तो आंबा सर्वात चांगला समजला जायचा म्हणून अक्षय तृतीयेपासून आंबे खायला सुरुवात होते. यावर्षी बाजारात आलेला आंबा हा गोडवा नसलेला आहे. त्यात अजून गोडवा तयार झालेला नाही. मराठवाड्यातील आंबा तर अजून आलेलाच नाही सध्या बाजारात आलेला आंबा हा कोकणातला आहे मात्र तोही अक्षय तृतीयेपर्यंत विकण्यासाठी तयार व्हावा म्हणून कोवळा तोडल्याने त्यात गोडवा नसल्याचे सांगितले. 

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

असा येतो आंब्यात गोडवा 

आंबा खूप गोड आणि रसाळ असेल तो चांगला आंबा. नैसर्गिकरित्या पिकवलेल्या आंब्याचा आजूबाजूला घमघमाट सुटतो. आंब्यात गोडवा कसा येतो याविषयी डॉ. कापसे म्हणाले, कोय तयार होण्यापूर्वी असलेलीची कैरी चवीला तुरट लागते. कोयीचे आवरण टणक व्हायला सुरुवात होते तेव्हा कैरीत आंबटपणा येतो व ती खाण्यायोग्य होते. नंतर त्यात पिष्टमय पदार्थ व मॅलिक ॲसिड तयार होते. आंबा काढणीला आल्यानंतर तो उतरवून पिकवायला ठेवला जातो त्यावेळी पिष्टमय पदार्थ आणि मॅलिक ॲसिडचे शर्करेत रूपांतर होत जाते हे रूपांतर ९८ टक्के झाल्यानंतर आंब्यात पूर्णपणे गोडवा येतो व रस तयार होतो. त्यात गोडवा आला की साल पिवळी दिसू लागते. 

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा

केशराने झाल्या आंब्याच्या जाती दुर्मीळ 

आंब्याच्या आकारावरून, चवीवरून त्यांचे वर्गीकरण करण्यात आले होते त्यात २५ - ३० वर्षांपूर्वी मराठवाड्यात साखऱ्या, खोबऱ्या, भदाड्या, केळ्या, पपया, शेप्या, शेंद्र्या, नाकाड्या, गोटी, हुर, हस्तात येणारा हसत्या, श्रावणात येणारा श्रावण्या अशा आंब्याच्या जाती होत्या. मात्र १९९०-९५ पासून मराठवाड्यात केशराची लागवड सुरू झाल्याने या जुन्या जाती दुर्मीळ होत गेल्या असल्याचे डॉ. कापसे यांनी सांगितले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Why Mango Season Starts From Akshaytrutiya Aurangabad News