
औरंगाबाद शहरातील भरवस्तीतील गांधीनगरमध्ये एका भोळसर महिला आपल्या २० दिवसांच्या बाळाला गटारीचे पाणी पाजते, तर कधी कडेवरुन फेकते, तर कधी वेडेपणाच्या भरात हाताची झोळी करुन झुलवत असल्याचा प्रकार समोर येताच दामिनी पथक, पोलिसांनी वेळीच धाव घेतली अन् त्या बाळाचे प्राण वाचविले.
औरंगाबाद : शहरातील भरवस्तीतील गांधीनगरमध्ये एका भोळसर महिला आपल्या २० दिवसांच्या बाळाला गटारीचे पाणी पाजते, तर कधी कडेवरुन फेकते, तर कधी वेडेपणाच्या भरात हाताची झोळी करुन झुलवत असल्याचा प्रकार समोर येताच दामिनी पथक, पोलिसांनी वेळीच धाव घेतली अन् त्या बाळाचे प्राण वाचविले. संबंधित भोळसर महिला ही बाळाचे संगोपन नीट करत नसल्याचे तसेच त्याला गटारीचे पाणी पाजत असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी क्रांती चौक पोलिसांना कळविली होती.
त्यानंतर ठाण्याच्या उपनिरीक्षक अनिता बागूल आणि दामिनी पथक यांनी धाव घेत बाळाला घाटी रुग्णालयात दाखल केल्याने स्थानिकांनी सुटकेचा निश्वास सोडला.
नागरिकांना ही महिला बाळाला नीट सांभाळत नसल्याचे निदर्शनास आले होते. मात्र तिच्या आक्रस्ताळेपणामुळे नागरिकांनाही काही करता येणे शक्य नव्हते. परंतू, दुसरीकडे तिच्या २० दिवसांच्या बाळाला त्याची भोळसर आई गटाराचे पाजताना बघवतही नव्हते. याबाबत शिल्पा चुडीवाल, नागरिकांनी क्रांती चौक पोलिसांना माहिती कळविल्यानंतर ठाण्याच्या निरीक्षक निर्मला परदेशी यांनी उपनिरीक्षक बागूल यांना सूचना दिल्या.
पोलिस उपनिरीक्षक बागूल यांची तत्परता
पोलिस उपनिरीक्षक बागुल यांनी तात्काळ धाव घेतली. त्यांनी सांगितले, की महिला बाळाला तिच्या ताब्यातून आमच्याकडे देत नव्हती. मात्र, बाळाच्या सुरक्षेसाठी घेणे गरजेचे होते. तब्बल तीन तासांच्या परिश्रमानंतर स्टाफ आणि स्थानिकांच्या मदतीने त्या बाळाला महिलेच्या ताब्यातून घेतले आणि लगोलग घाटीत दाखल केल्याचे बागलू यांनी ‘सकाळ’ शी बोलताना सांगितले. बाळाची तब्येत चांगली असून बाळाजवळ त्याच्या आजोबांना थांबविले आहे. संबंधित महिलेला कादरी मेंटल हॉस्पिटलला दाखल करण्यात येणार आहे. या कामी दामिनीच्या स्नेहा करेवाड तसेच ठाण्यातील शरद देशमुख, महिला पोलिस कर्मचारी राजपूत, ज्योती कीर्तीकर, हवालदार मदे, आशा गायकवाड यांनी साहाय्य केले.
पेट्रोल, डिझलची चोरी करणाऱ्या रॅकेटचा भांडाफोड; सहा जण अटकेत
काळीज हेलावणारे दृश्य होते. तब्बल तीन तासानंतर त्या बाळाला भोळसर महिलेच्या ताब्यातून घेतले. उपचाराकामी आम्ही बाळाला घेऊन घाटीत जात असतानाही भोळसर महिला मागे येत होती. ते साहजिक जरी असले तरी बाळाला वाचवणे गरजेचे होते. बाळ ठणठणीत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
-अनिता बागूल, पोलिस उपनिरीक्षक, क्रांती चौक पोलिस ठाणे.
संपादन - गणेश पिटेकर