
कलाग्रामच्या संरक्षण भिंतीची उंची कमी असल्यामुळे येथून कोणीही आत येऊ शकतो किंवा अलगीकरण कक्षातील एखादी व्यक्ती महापालिका कर्मचाऱ्यांची नजर चुकवून बाहेर जाऊ शकते. तसेच रात्रीच्या वेळी हा भाग सुनसान असल्यामुळे महिला, लहान मुले या ठिकाणी राहू शकतील का, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. त्यामुळे या ठिकाणी कोंडवाड्यासारखे फिलींग येत आहे.
औरंगाबाद - कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांच्या संपर्कात आलेले नागरिक व विदेशातून शहरात आलेले पर्यटक, नागरिकांसाठी गरवारे स्टेडियमलगत असलेल्या ‘कलाग्राम’मध्ये महापालिकेने अलगीकरण कक्ष सुरू केला आहे. मात्र, या ठिकाणी असलेल्या गाळ्यांमध्ये फक्त पांढरे कपडे बांधून त्यात १०० बेड टाकण्यात आले आहेत. कलाग्रामच्या संरक्षण भिंतीची उंची कमी असल्यामुळे येथून कोणीही आत येऊ शकतो किंवा अलगीकरण कक्षातील एखादी व्यक्ती महापालिका कर्मचाऱ्यांची नजर चुकवून बाहेर जाऊ शकते. तसेच रात्रीच्या वेळी हा भाग सुनसान असल्यामुळे महिला, लहान मुले या ठिकाणी राहू शकतील का, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. त्यामुळे या ठिकाणी कोंडवाड्यासारखे फिलींग येत आहे. दरम्यान, सुरक्षेच्या दृष्टीने या ठिकाणी सीसीटीव्ही लावण्याचे आदेश महापौरांनी गुरुवारी (ता. १९) दिले आहेत.
हेही वाचा- आता गर्दी कराल तर गुन्हे दाखल होणार
प्रशासकीय यंत्रणा सज्ज
शहरात कोरोनाग्रस्त महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग व महापालिकेतर्फे विविध उपाययोजना केल्या जात आहेत. महापालिकेने बुधवारी (ता. १८) कलाग्रामची इमारत ताब्यात घेऊन या ठिकणी अलगीकरण कक्ष सुरू केला आहे. क्रेडाई, हॉटेल, रेस्टॉरंट असोसिएशनतर्फे या ठिकाणी सर्व व्यवस्था करून देण्यात आली आहे. सकाळी चहा, फराळ, दोनवेळचे जेवण, कूलर्स, पंखे, मनोरंजनासाठी टीव्ही संच, कॅरम बोर्ड, क्रिकेट किटही उपलब्ध करून देण्यात आली असल्याचे महापौर नंदकुमार घोडेले यांनी गुरुवारी सांगितले.
हेही वाचा- औरंगाबादेत 28 संशयित रुग्ण होम क्वारंटाईन
जागेबाबत मात्र आश्चर्य
अलगीकरण कक्षासाठी निवडण्यात आलेल्या जागेबाबत मात्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे. कलाग्रामच्या आजूबाजूला नागरी वसाहती नसल्यामुळे ही जागा निवडण्यात आल्याचे प्रशासनातर्फे सांगितले जात असले तरी संपूर्ण वातावरण एकदम मोकळे आहे. कलाग्रामच्या संरक्षक भिंतीवर सहज कोणी उडी मारून आत किंवा बाहेर येऊ-जाऊ शकते. अनेक जण अलगीकरण कक्षात येण्यास विरोध करीत आहेत. असे नागरिक या ठिकाणाहून सहज बाहेर जाऊ शकतात. यासंदर्भात महापौर नंदकुमार घोडेले यांना विचारणा केली असता, सीसीटीव्ही व्यवस्थेची सूचना प्रशासनाला करण्यात आली आहे. तसेच सुरक्षा रक्षकदेखील ठेवले जाणार आहेत. येथे राहण्यास कोणी विरोध केला किंवा अनुचित प्रकार घडला तर पोलिसांचीही मदत घेतली जाईल, असे श्री. घोडेले यांनी नमूद केले.
महिला, लहान मुलांसाठी असुरक्षित भाग
अलगीकरण वॉर्डात कुटुंबदेखील येऊ शकतात. महिला व पुरुषांसाठी वेगवेगळी व्यवस्था करण्यात आली आहे. त्यानुसार कर्मचारीदेखील नियुक्त करण्यात आले आहेत. मात्र रात्रीच्या वेळी हा भाग सुनसान असतो. ज्या गाळ्यात बेड लावण्यात आले आहेत, तिथे शटर उघडून फक्त पांढरे पडदे बांधण्यात आले आहेत. त्यामुळे महिला व मुले रात्रीच्या वेळी घाबरून जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.