
‘एमबीबीएस’चा विद्यार्थी यश गंगापूरकरने आत्महत्या केली.
औरंगाबाद : ‘एमबीबीएस’चा विद्यार्थी यश गंगापूरकरने आत्महत्या केली. तो वैद्यकीय शिक्षणाचा पूरेपूर उपयोग समाजातील होतकरू, गरीब लोकांसाठी करीत होता. घाटी व इतर परिसरात रस्त्यावर बसलेल्या होतकरू रुग्णांची तो मोफत तपासणी करायचा. स्वखर्चातून औषधीही तो देत होता. त्याच्या आत्महत्येने धक्का बसल्याचे त्याचे मित्र सांगतात.
मित्रांच्या माहितीनुसार, यश अभ्यासू विद्यार्थी होता. त्याने त्याच्या वाढदिवशी घाटी रुग्णालयात उपचारासाठी आलेले व रस्त्यावर बसलेल्या रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना शालींचे वाटप केले होते. कोविड काळात कामाशिवायही तो विविध ठिकाणी नागरिकांना कोरोना व उपायांबाबत मार्गदर्शन केले होते. वैद्यकीय शिक्षणाचा उपयोग होतकरू व गरीब व्यक्तींसाठी त्याने केला. दोन महिने मोफत तपासणीही त्याने केली होती. स्वतःच्या पैशांतून त्याने गरिबांना औषधी देऊन मदत केली होती. तो एका सामाजिक संस्थेसोबतही जोडला गेला होता.
मी कारण सांगणार नाही!
विषारी रसायन पिल्यानंतर यशला रुग्णालयात दाखल केले होते. त्यादरम्यान त्याच्या मित्राने त्याला रसायन पिण्याचे कारण विचारले तेव्हा त्याने ‘मी कारण सांगणार नाही’ असे त्याने सांगितले. अर्थातच आत्महत्येचे कारण त्याला सांगायचेच नव्हते, असे दिसते.
संपादन - गणेश पिटेकर