घर कसे चालवायचे या चिंतेतून तरुण शेतकऱ्याने संपवले जीवन, विषारी कीटकनाशक घेऊन केली आत्महत्या

विकास पाटील
Saturday, 5 December 2020

अतिवृष्टीमुळे झालेले शेतीचे नुकसान, डोक्यावरील वाढलेल्या कर्जाचा भारासह परिवाराचा उदरनिर्वाह पुढे कसा चालवायचा या चिंतेने किन्ही (ता.सोयगाव) येथील तीसवर्षीय तरुण शेतकऱ्याने विषारी कीटकनाशक प्राशन करीत जीवन संपविल्याची दुर्दैवी घटना शनिवारी (ता.पाच) पहाटे घडली.

बनोटी (जि.औरंगाबाद) : अतिवृष्टीमुळे झालेले शेतीचे नुकसान, डोक्यावरील वाढलेल्या कर्जाचा भारासह परिवाराचा उदरनिर्वाह पुढे कसा चालवायचा या चिंतेने किन्ही (ता.सोयगाव) येथील तीसवर्षीय तरुण शेतकऱ्याने विषारी कीटकनाशक प्राशन करीत जीवन संपविल्याची दुर्दैवी घटना शनिवारी (ता.पाच) पहाटे घडली. मृताचे नाव विजेंद्र (ऊर्फ सोनू) सुरेश देशमुख असे आहे. किन्ही येथील लताबाई सुरेश देशमुख यांची गट नं.३५ मध्ये दोन एकर शेती असून त्यांची दोन मुले त्या जमिनीस वारस आहेत. विजेंद्र हा घरातील कर्ता होता.

शेतात कपाशी व आरबी पिकांची लागवड केली होती. यंदा परिसरात अतिवृष्टी झाल्याने शेतातील सर्व पीक वाया गेले. त्यातच कर्जमाफीचा लाभ, अतिवृष्टीचे अनुदानही मिळाले नाही. वाढलेल्या खर्चाने जेरीस आलेल्या विजेंद्रने शनिवारी सकाळी शेतात गुराढोरांना चारापाणी करण्यासाठी जातो असे सांगून शेतात गेला आणि कीटकनाशक प्राशन करून जीवन संपविले. काही वेळानंतर बाजूला असलेले शेतकरी प्रवीण जैन शेतात गेले असता विजेंद्रने विष प्राशन केलेले आढळले.

त्यांनी तत्काळ घरच्या मंडळींना सोबत घेऊन बनोटी येथील खासगी दवाखान्यात उपचारासाठी घेऊन गेले असता डॉक्टरांनी तपासून मृत झाल्याचे घोषित केले. बनोटी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी कृष्णा घावटे यांनी उत्तरीय तपासणी केली. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक श्रीधर गीते, सुभाष पवार, विकास दुबिले, दिलीप कडवी, श्रीकांत पाटील आदी करीत आहेत.
 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Young Farmer Committed Suicide Aurangabad News