आईवडिलांचा एकमेव आधार हिरावला, कर्जामुळे तरुण शेतकऱ्याने केली आत्महत्या

शेख मुनाफ
Wednesday, 20 January 2021

यंदा वेळोवेळी झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकाचे लागवड खर्च ही निघाले नाही.

आडुळ (जि.औरंगाबाद) : कर्जाला कंटाळून २१ वर्षीय तरुण शेतकऱ्याने शेतात मुलाला झोपण्यासाठी केलेल्या झोक्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना ब्राह्मणगाव (ता.पैठण) येथे बुधवारी (ता.२०) संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास घडली. संदिप अशोक नागरे असे आत्महत्या केलेल्या तरुण शेतकऱ्याचे नाव आहे. संदिप नागरे याचे वडील अशोक नागरे हे अपंग असून त्यांच्या नावे ब्राह्मणगाव शिवारातील गट क्रमांक १११ व ११२ मध्ये सहा एकर जमीन आहे.

त्यावर एका राष्ट्रीयीकृत बँकेचे थकित कर्ज आहे. त्यात यंदा वेळोवेळी झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकाचे लागवड खर्च ही निघाले नाही. वडीलाकडे असलेले कर्ज कसे फेडावे या चिंतेने ग्रासलेल्या संदीप नागरे यांनी बुधवारी संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास स्वतःच्या शेतात मुलाला झोपविण्यासाठी केलेल्या झोक्याला गळफास घेतला. ही माहिती कळताच ब्राह्मणगाव येथील नवनाथ सांगळे, शेख आजीज, रंजित ढाकणे, बाळु ढाकणे, जगन घुले, सुरेश धोत्रे, एकनाथ यशवंत, सचिन धोत्रे, सुरेश घुले, भरत ढाकणे यांनी मदत कार्य केले. १०८ रुग्णवाहिकेचे डॉक्टर सय्यद असलम यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन सदरील तरुणास पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथे दाखल केले. शासकीय रुग्णालयाच्या डॉक्टरांनी तपासून त्यास मृत घोषित केले. संदीपच्या पश्‍चात आई, वडील असा परिवार आहे.

झाडाला गळफास घेतलेला फोटो व्हॉट्सॲप डीपीला
संदिप याचे वडील अपंग असल्याने घराची जबाबदारी संदिपवरच  होती. त्यामुळे तो शेती व्यतिरिक्त वाहन चालक म्हणून काम करीत होता. त्याने कुटुंब आर्थिक अडचणीत सापडल्याने च आत्महत्या केल्याचे त्याचे वडील अशोक नागरे यांनी सांगितले. मृत संदिप नागरे यांनी आज झाडाला गळाफास घेतलेला व्हॉट्सॲप डिपी ठेवला होता व अबाऊटमध्ये टेन्शन नाही राहणार आजच्या नंतर असे आत्महत्या करण्यापूर्वी लिहिले होते. त्यामुळे तो संध्याकाळी शेतात आत्महत्या करण्यासाठी च गेला होता असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

 

संपादन - गणेश पिटेकर

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Young Farmer Committed Suicide Aurangabad News