Breaking: मराठा आरक्षणासाठी तरूणाने घेतले विष, तत्पूर्वी फेसबुक लाईव्हद्वारे मांडले प्रश्न

अतुल पाटील
Wednesday, 20 January 2021

सरकार फक्त राजकारण करत आहे. त्याना कुणाचे कुणाशी काही देणे-घेणे नाही. ते स्वत:च्या पोळ्या भाजण्याचे काम करत आहेत.

औरंगाबाद : मराठा क्रांती मोर्चाच्या दत्ता भोकरे पाटील या तरुण कार्यकर्त्याने बुधवारी (ता. २०) सायंकाळी सातनंतर क्रांतीचौकात विष प्राशन केले. तत्पूर्वी त्याने फेसबुकवर लाईव्ह करुन प्रश्न मांडले. समाजातील विद्यार्थ्यांचे प्रश्‍न मांडताना त्याचे डोळे डबडबले होते. त्याच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरु असून प्रकृती स्थिर आहे. मराठा क्रांती मोर्चात पुढे असलेल्या दत्ता भोकरे पाटील याने फेसबुकवर लाईव्हवर म्हटले आहे, ‘मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी न लागल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे.

Success Story: तरुणीने केली कंपनी सुरु: सेंद्रिय गुळापासून पंधरा फ्लेवर्स, चॉकलेट पॉवडर, इन्स्टंट चहाचे उत्पादन; शंभरावर लोकांना दिला रोजगार

सरकार फक्त राजकारण करत आहे. त्याना कुणाचे कुणाशी काही देणे-घेणे नाही. ते स्वत:च्या पोळ्या भाजण्याचे काम करत आहेत. आज साष्टी पिंपळगाव (ता. अंबड, जि. जालना) येथे सुरु असलेल्या आंदोलनाला समाजाचे पाठिंबा दिला, त्याबद्दल अभिनंदन केले पाहिजे. पुढाकार घेतला त्याबद्दल समन्वयकांचेही धन्यवाद. मी लाईव्ह येण्याचे कारण म्हणजे...’ असं म्हणत भावनिक होत त्याने फेसबुक लाईव्ह बंद केले आणि त्यानंतर विष प्राशन केले.

दत्ता भोकरे याने लाईव्ह करताना काही जणांना टॅग केले होते. लाईव्ह येताना त्याने डोक्यावर मराठा क्रांती मोर्चाची टोपी घातली होती. ते पाहून क्रांती चौक पोलिसांना याबाबत माहिती दिली. दत्ता भोकरे हा अखिल भारतीय छावा मराठा संघटनेचा शहर प्रसिद्धी प्रमुख आहे. तसेच तो शहरातील शिवाजीनगरचा रहिवासी आहे.

आत्महत्या करत असल्याचा मेसेज
क्रांती चौकातून फेसबुक लाईव्ह करण्यापुर्वी दत्ता भोकरे याने अभिजीत देशमुख यांना मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करत असल्याचा मेसेज केला. ही बाब त्यांनी विनोद पाटील यांना सांगितली. तत्काळ त्यांनी क्रांती चौक पोलिस ठाण्यात संपर्क साधला. त्याला तत्काळ घाटीत नेण्यात आले. डॉक्टरांनी शरीरातील विष काढले असून त्याची तब्येत स्थिर आहे. तो आता बोलत असल्याचे विनोद पाटील यांनी ‘सकाळ’ला सांगितले.

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Youth Committed Suicide For Maratha Reservation Aurangabad Latest News