
चाळीस वर्षांपासून शेतात चालणाऱ्या पारंपरिक गुळाचा व्यवसाय पुढे नेत एका उमद्या तरुणीने ‘गुडवर्ल्ड-गुडनेस नॅचरली’ या कंपनीची स्थापना केली आहे.
औरंगाबाद : हल्ली रसायनमुक्त पदार्थ खाण्याकडे जास्त लक्ष दिले जात आहे. प्रकृती चांगली राहावी यासाठी आरोग्यदायी व सकस अन्नपदार्थाला चांगला वाव आहे. हीच बाब लक्षात घेता चाळीस वर्षांपासून शेतात चालणाऱ्या पारंपरिक गुळाचा व्यवसाय पुढे नेत एका उमद्या तरुणीने ‘गुडवर्ल्ड-गुडनेस नॅचरली’ या कंपनीची स्थापना केली आहे. साखरेला पर्याय म्हणून सेंद्रीय गुळापासून पंधरा फ्लेवर्स, चॉकलेट पॉवडर, इन्स्टंट चहा, कॉफी आदी उत्पादनेही कंपनीद्वारे तयार केली आहेत. यातून तब्बल शंभरावर लोकांना रोजगार मिळाला आहे.
पुण्यातील विद्यापीठात लिबरल आर्टचे शिक्षण घेत व्यवसायात उतरण्याचा निर्णय औरंगाबादेतील प्रिती प्रभाकर शिंदे यांनी घेतला. घरातीलच गुऱ्हाळाच्या व्यवसायाला चालना देत गुडवर्ल्ड हे ‘स्टार्टअप’ जामगाव (ता. गंगापूर) येथे त्यांनी सुरु केले. पहिल्यांदा त्यांनी गुळाचे पाच व दहा ग्रॅमचे क्युब तसेच चॉकलेट पावडर, इन्स्टंट चहा व कॉफी तयार केली, असे १५ प्रकारचे फ्लेवर्स त्यांनी तयार केले. डायनिंग टेबल, प्रवासात, चॉकलेटप्रमाणे क्यूब नेणे सोईस्कर आहे. सध्या रोज ३० टन पदार्थांचे उत्पादन होत असून ते पुढे ६० टनावर पोचेल, लवकरच अमेरिका व इंग्लडमध्ये हा प्रकल्प सुरु करणार असल्याचे प्रिती सांगतात.
हे आहे वेगळेपण
गुळाच्या भेलीऐवजी ५ ते १० ग्रॅमचे क्यूब तयार केले आहेत. तसेच घट्ट व पावडर व पातळ स्वरुपातही गुळ उपलब्ध आहे. यात जीवनसत्वे व खनिजे भरपूर आहेत. गुळाचे बदाम, काजू, शेंगदाणा, तीळ, विलायची, अद्रक, पुदीना, हळद, तुळस, कॉफी, चॉकलेट, संत्रा, अननस,, आंबा, शतावरी, अश्वगंधा, ब्राह्मी, देशी तुप, बडीशेप असे फ्लेवर्स आहेत. यात ग्लुटन, जीएमओ, कृत्रिम रंगाचा वापर करण्यात आला नाही.
औरंगाबादच्या ताज्या बातम्या वाचा
जगातील ७० टक्के गुळ भारतात तयार होतो. पण गुळाचा एकही जागतिक ब्रॅंड होऊ शकला नाही. असा ब्रॅंड तयार करण्यासाठी चार वर्षे संशोधन केले व त्यातून १०० टक्के ऑॅर्गेनिक वापरण्याला सोपा व १५ फ्लेवर्समधील गुळ तयार केला. सध्या ही उत्पादने सुपरमार्केट, मॉल, किराणा दुकान व इकॉमर्स कंपन्यांकडेही उपलब्ध आहे. शेतकऱ्यांनाही त्याचा नक्कीच फायदा होईल.
- प्रिती शिंदे, व्यवस्थापकीय संचालक, गुडवर्ल्ड गुडनेस नॅचरली.
Edited - Ganesh Pitekar