घराचा दरवाजा बंद केला अन् प्लास्टिक टाकीत स्वतःला बुडवून तरुणाची आत्महत्या

मनोज साखरे
Sunday, 20 December 2020

बनेवाडीत घराचा दरवाजा बंद करुन दरवाजाच्या लगतच पाण्याने भरलेल्या प्लास्टिक टाकीत स्वतःला बुडवून तरुणाने आत्महत्या केली. ही घटना रविवारी (ता.२०) दुपारी दोननंतर उघडकीस आली.

औरंगाबाद : बनेवाडीत घराचा दरवाजा बंद करुन दरवाजाच्या लगतच पाण्याने भरलेल्या प्लास्टिक टाकीत स्वतःला बुडवून तरुणाने आत्महत्या केली. ही घटना रविवारी (ता.२०) दुपारी दोननंतर उघडकीस आली. पोलिस व स्थानिकाच्या माहितीनुसार, बाळु भिवसन अवचरमल (वय ४०, रा. बनेवाडी) असे आत्महत्या करणाऱ्याचे नाव आहे. ते पीठाची गिरणी चालवून उदरनिर्वाह करीत होते. आई, पत्नी व पंधरा वर्षीय मुलासोबत बनेवाडीत ते राहत होते. दोन खोल्यांपैकी एका खोलीत त्यांची आई राहत होती.

 

 

समोरच्या खोलीत बाळु अवचरमल राहत होते. स्थानिकांनी माहिती दिली की, त्यांचा व त्यांच्या पत्नीचा वाद झाला होता. त्यानंतर पत्नी माहेरी निघून गेली. पण मुलगा त्यानंतर ते शुक्रवारी (ता.१८) शेजाऱ्यांना शेवटचे दिसले. त्यांचा पंधरा वर्षीय मुलगा व त्यांची आई बाळू यांना शोधत होते. खोलीतही अनेकदा हाक दिली. पण आतूनही प्रतिसाद येत नव्हता. कदाचित ते झोपले असावेत असा शनिवारी समज झाला.

 

 

त्यानंतर रविवारीही आतून प्रतिसाद येत नसल्याने स्थानिक सामाजिक कार्यकर्ते नितीन दाभाडे यांनी धाव घेत खोलीच्या पत्र्यातून डोकावून पाहिले तेव्हा प्लास्टिकच्या टाकीत बाळू त्यांना दिसले. त्यांनी पोलिसांना बोलावत टाकीसह घाटीत त्यांना नेले. तेथे टाकी कापून त्यांचा मृतदेह बाहेर काढून उत्तरीय तपासणी केली. या प्रकरणी वेदांतनगर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.

 

 

संपादन - गणेश पिटेकर

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Youth Committed Suicide Drowned Plastic Tank Aurangabad News