पावसामुळे पिके हातची गेल्याने तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

पोपट भुसारी
Saturday, 10 October 2020

औरंगाबाद जिल्ह्यातील दिगाव येथील तरुण शेतकऱ्याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.

शेलगाव (जि.औरंगाबाद) : कर्जबाजारीपणा व अतिवृष्टीमुळे शेतातील उभे पीक हातचे गेल्याने निराश झालेल्या दिगाव (ता.कन्नड) येथील तरुण शेतकऱ्याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. अंकुश नामदेव सुसुंद्रे असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. ही घटना शनिवार (ता.दहा) सकाळी नऊच्या दरम्यान घडली. एकुलत्या एका मुलाने आत्महत्या केल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

तीन हजार लोकसंख्येची तहान भागते फक्त हातपंपांवर, पाणीपुरवठा योजना कोसो दूर

दिगाव येथील शेतकरी नामदेव सुसुंद्रे यांना चार एकर जमीन आहे. त्यांना एक मुलगा, दोन मुली असा परिवार आहे. दोन मुलींचे लग्न झालेले आहे. अंकुश याचे शिक्षण १२ वीपर्यंत झालेले आहे. तो शेती करून सैन्य दलात भरती होण्याचे स्वप्न उराशी बाळगून सैन्य भरतीची तयारी करीत होता. तो दोन-तीन वेळेस भरतीसाठी ही गेला होता. मात्र त्यात त्याला यश आले नाही. त्यामुळे तो गेल्या काही दिवसांपासून निराश राहत होता. तो वडिलांना शेती कामात मदत करीत असे.

मागील महिन्यात शेलगावसह दिगाव परिसरात सलग दहा दिवस पावसाने थैमान घातल्याने अंकुश यांच्या शेतातील खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले होते. हातातोंडाशी आलेले पीक अतिवृष्टीमुळे हातचे गेल्याने झालेला खर्चही न निघण्यासारखी परिस्थिती होती. याची जाणीव अंकुशला झाली होती. सुरवातीपासून पीक चांगले असल्याने त्याला शेतीतून यंदा चांगल्या उत्पादनाची अपेक्षा होती. गेल्या वर्षी ही परतीच्या पावसाने पिकाचे मोठे नुकसान झाल्याने केलेला खर्च ही निघाला नव्हता.

अंगावर वीज पडून दोघी मायलेकी जखमी, जालना जिल्ह्यातील घटना

यंदाही तीच परिस्थिती ओढावल्याने अंकुश हा गेल्या काही दिवसांपासून निराश होता. या नैराश्यातूनच अंकुशने टोकाचे पाऊल उचलले. शनिवारी सकाळी नऊच्या सुमारास त्यांच्या शेताला लागून असलेल्या गट क्रमांक ३९६ मध्ये असलेल्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही बाब त्याच्या आई-वडिलांच्या लक्षात आली. त्यांनी आरडाओरड करून स्थानिकांना बोलावले. मात्र उपयोग झाला नाही, असे नातेवाईकांनी सांगितले. अंकुश याच्या वडिलांच्या नावावर सेवा संस्थेचे कर्ज व बँकेचे कर्ज होते. चिंचोली लिंबाजी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करून दिगाव येथे शोकाकुल वातावरणात दुपारी तीन वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.

 

संपादन - गणेश पिटेकर

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Youth Farmer Committed Suicide Due To Crops Damaged Aurangabad News