अंगावर वीज पडून दोघी मायलेकी जखमी, जालना जिल्ह्यातील घटना

बाबासाहेब गोंटे
Saturday, 10 October 2020

जालना जिल्ह्यातील अंबड शहरालगत असलेल्या पारनेर तांडा येथे महिला शेतमजूर व तिच्या मुलीच्या अंगावर वीज पडून जखमी झाल्याची घटना शनिवारी (ता.दहा) घडली आहे.

अंबड (जि.जालना) : जालना जिल्ह्यातील अंबड शहरालगत असलेल्या पारनेर तांडा येथे महिला शेतमजूर व तिच्या मुलीच्या अंगावर वीज पडून जखमी झाल्याची घटना शनिवारी (ता.दहा) घडली आहे. महिला शेतमजूर संगीता रोहिदास चव्हाण (वय ४०) व मुलगी वैष्णवी रोहिदास चव्हाण (वय १८) असे जखमी मायलेकींचे नाव आहेत.

दोघी मायलेकी शेतात कपाशीची वेचणी करत असताना आकाशात विजेचा जोरात कडकडाट होऊन वीज त्यांच्या अंगावर पडली. शनिवारी अंबड शहर व परिसरात आकाशात ढग चांगलेच दाटून आले होते. त्यातच जोराचे वादळ वारे सुरू झाले. ढगांच्या गडगडाटाबरोबर पावसाला सुरवात झाली. वीज पडल्याने वैष्णवी चव्हाण, संगीता चव्हाण या होरपळ्या.

लातूरहून पुणे, मुंबई, हैदराबादलाही आता बससेवा

तात्काळ त्यांना उपचारासाठी नातेवाईक व ग्रामस्थांच्या मदतीने अंबड शहरातील एका खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले. दोघी मायलेकींवर प्राथमिक उपचार सुरू आहेत. पारनेर तांडा शेतशिवारातील वीज पडल्याच्या घटनेने दोघी शेतकरी मायलेकी महिला मजूर यातून बचावल्या आहेत.

शेतकरी धास्तवला
अंबड तालुक्यात गत तीन ते चार दिवसांपासून वातावरणात बदल होऊन पावसाचे संकेत दिसून येत आहे. त्यामुळे शेतकरी शेतमजूर मिळविण्यासाठी धावपळ करत आहेत. शेतातील मका, बाजरी, सोयाबीनची काढणी, मळणी तसेच कापूस वेचणी, रब्बीची पेरणी उरकण्यासाठी एकच धावपळ उडत आहे. पावसामुळे शेतातील उभ्या पिकांचे नुकसान होऊ नये. यासाठी लगबग करत आहेत. मात्र सध्या हवामान खात्याकडून पावसाचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Thunderstorm Injured Mother And Her Daughter Ambad News