तीन हजार लोकसंख्येची तहान भागते फक्त हातपंपांवर, पाणीपुरवठा योजना कोसो दूर

अमोल नाईक
Saturday, 10 October 2020

औरंगाबाद जिल्ह्यातील जळकी गावाची तहान सहा हातपंपांवर भागविली जाते.

उंडणगाव (जि.औरंगाबाद) : वाडी, वस्ती अथवा खेड्यातील एखाद्या गल्लीत पाणीपुरवठा योजना नाही इथपर्यंत पाण्याची समस्याचे चित्र समजण्यासारखे. मात्र चक्क तीन हजार लोकसंख्या असलेल्या जळकी(ता.सिल्लोड)गावात स्वातंत्र काळापासून पाणीपुरवठा पाईप लाईनच नसल्याची शोकांतिका प्रगती पथावर असलेल्या महाराष्ट्रा राज्यात आजही पाहावयास मिळते. अजिंठा डोंगर रांगेत जळकी हे गाव वसले आहे.

या गावाच्या चारही बाजूस घनदाट जंगल आहे. पूर्वी वसई जळकी गट ग्रामपंचायत होती. आता जळकीची स्वतंत्र पंचायत आहे. सात सदस्य संख्या असलेल्या गावात तीन हजार लोक राहतात. जिल्हा परीषदेची प्राथमिक शाळा, अंगणवाड्या, महिला बचत गट, व्यापार, उदीमची साखळी. शिक्षणाच्या सोयी सुविधेने मुलामुलींचा वाढलेला शिक्षणाकडे ओढा, जगाशी संपर्कात राहण्यासाठी डिजिटल तंत्राचा वापर अस सार काही प्रगतीच्या दिशेला वाटचाल करणार जळकी गाव.

अंगावर वीज पडून दोघी मायलेकी जखमी, जालना जिल्ह्यातील घटना

आधुनिकतेची कास धरलेल्या गावात मात्र चक्क स्वातंत्र काळापासून पाणीपुरवठा योजनाच नसून हे न पटण्यासारख. पण वस्तुस्थिती खरीच आहे. आजही महिला गावातील सहा सरकारी हातपंपांवर पाणी भरतात. तंटामुक्ती गावच्या पुरस्कारातून तात्पुरती एक लाख रुपयाची उन्हाळ्यात पाण्यासाठी तजबीज केली होती. दलित वस्तीत पाईप लाईन टाकण्याचे काम हाती घेतले होते. त्यासाठी प्रकल्प विहीर खोदली आहे. पाणी योजनेचा प्रस्ताव पाठविलेला होता. मात्र प्रस्ताव लालफितीच्या कारभारात अडकलेला असल्याची माहीती मिळाली.

मात्र निसर्गाने तारले
पाणीपुरवठा योजना नसल्याने टंचाई काळात महिलांची पाण्यासाठी पायपीट होते. लहान मुलेही डोक्यावर हंडा घेऊन पाणी आणतात. यंदा मात्र पावसाने मेहेरबानी केल्याने गावाजवळचा जळकी मध्यम प्रकल्प ओसंडून वाहत आहे. त्यामुळे गावातील हापशा न हापसता पाणी देत असल्याने सरकारने मारले तरी निसर्गाने तारले असेच म्हणावे लागेल.

लातूरहून पुणे, मुंबई, हैदराबादलाही आता बससेवा

उशाशी मध्यम प्रकल्प!
वाघरा नदीचा उगम जळकीच्या डोंगर पट्ट्यातून झालेला आहे. याच नदीवर जळकीत मध्यम प्रकल्प उभा करण्यात आलेला आहे. याच धरणातून हळदा, डकला, वसई, कोंबडवाडी आदी गावांची पाणीपुरवठा योजना कार्यान्वित आहे. मात्र गावाच्या उशाशी धरण असताना पाण्यासाठीचे हाल मायबाप सरकाराच्या गलथान कारभाराचे द्योतक ठरले आहे.

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hand pumps Only Source Of Water To Jalki Village Aurangabad News