तरुणाने स्वतःचे घर दिले क्वारंटाइनसाठी 

शेखलाल शेख
Thursday, 9 July 2020

पिसादेवी (ता.औरंगाबाद) येथील तरुण किरण डोरले याने गावातील स्वतःचे घर क्वारंटाइनसाठी दिले आहे. यात पिसादेवी गावातील कुणी पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला तर त्यांच्या निगेटिव्ह असलेल्या नातेवाइकांना राहण्याची व्यवस्था क्वारंटाइन सेंटरमध्ये केली आहे. सध्या येथे दहा बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. 

औरंगाबाद: गावात, गल्लीत, कॉलनीत, सोसायटी जरी कोरोनाचे रुग्ण आढळून आले तर अनेकांच्या मनात धडकी भरते. तर काही जण आपल्याजवळ क्वारंटाइन सेंटर नको, अशी भूमिका घेतात. मात्र या संकटाच्या परिस्थितीतही अनेक जण मदतीसाठी पुढे आले आहेत.

अशीच मदत पिसादेवी (ता.औरंगाबाद) येथील तरुण किरण डोरले याने केली आहे. त्याने गावातील स्वतःचे घर क्वारंटाइनसाठी दिले आहे. यात पिसादेवी गावातील कुणी पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला तर त्यांच्या निगेटिव्ह असलेल्या नातेवाइकांना राहण्याची व्यवस्था क्वारंटाइन सेंटरमध्ये केली आहे. सध्या येथे दहा बेडची व्यवस्था करण्यात आली आहे.

सध्या गावात रुग्ण नाही; मात्र भविष्यात कुणी गावात पॉझिटिव्ह आले आणि त्यांच्या नातेवाइकांकडे होम क्वारंटाइनसाठी व्यवस्था नसली तसेच ज्यांची इच्छा असेल त्यांच्यासाठी किरण डोरले यांनी व्यवस्था केली आहे. त्यांचे गावात पाच खोल्यांचे घर आहे.

हेही वाचा- औरंगाबादेत पुन्हा 166 रुग्णांची वाढ

याममधील चार खोल्यांमध्ये त्यांनी पंधरा दिवसांपूर्वी राहण्याची व्यवस्था केली आहे. येथे पाणी, मास्क, सॅनिटायझर अशी व्यवस्था राहील. मात्र येथे क्वारंटाइन सेंटरमध्ये असलेल्यांसाठी त्यांच्या नातेवाइकांना जेवणाचे डबे आणून द्यावे लागतील. यातील गरिबांसाठी चहा, बिस्किटांची व्यवस्था किरण डोरले यांच्याकडून केली जाणार आहे. तसे फलकही गावात लावण्यात आलेले आहे. 

गावासाठी सुविधा 

याविषयी किरण डोरले म्हणाले, की अभिजित देशमुख यांच्याशी चर्चा करताना मला क्वारंटाइन सेंटरची कल्पना सुचली. लगेचच यावर अंमलबजावणी करत ग्रामपंचायत, ग्रामसेवक, सरपंच, पोलिस पाटील यांच्याकडून परवानगी मिळविली. ग्रामपंचायतीने यासाठी परवानगीही दिली. ही सुविधा फक्त गावातील लोकांसाठीच आहे. आमच्याकडे दोन एकर शेती आहे; तसेच राहण्यासाठी आणखी दुसरे घर असल्याने गावातील घर क्वारंटाइनला दिले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Youth Initiative Quarantine Centre In Village Aurangabad News