औरंगाबाद-जळगाव रस्त्यासाठी वीस टक्के अधिक निधीची तरतूद

आदित्य वाघमारे
मंगळवार, 6 ऑगस्ट 2019

पर्यटक आणि प्रवाशांसाठी सध्या डोकेदुखी ठरलेल्या औरंगाबाद-जळगाव रस्त्याच्या कामाला वेग देण्यासाठी वाढीव निधी देण्यास सोमवारी केंद्राने मंजुरी दिली आहे. रस्ते मंत्रालयाच्या आर्थिक सल्लागारांच्या आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत चौपदरीकरणाला औपचारिक मंजुरी आणि वीस टक्के वाढीव निधी देण्याचा निर्णय घेण्यात आला. 

औरंगाबाद -पर्यटक आणि प्रवाशांसाठी सध्या डोकेदुखी ठरलेल्या औरंगाबाद-जळगाव रस्त्याच्या कामाला वेग देण्यासाठी वाढीव निधी देण्यास सोमवारी केंद्राने मंजुरी दिली आहे. रस्ते मंत्रालयाच्या आर्थिक सल्लागारांच्या आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत चौपदरीकरणाला औपचारिक मंजुरी आणि वीस टक्के वाढीव निधी देण्याचा निर्णय घेण्यात आला. 

औरंगाबाद ते जळगाव रस्त्यावर सुरू असलेल्या विस्ताराच्या कामाने पर्यटन आणि प्रवाशांचे कंबरडे मोडले आहे. या रस्त्याने अजिंठ्याला येणाऱ्या पर्यटकांची घटती संख्या आणि त्याच्याशी निगडित पैलूंवर प्रकाश टाकला होता. त्यावर न्यायालयाने पुढाकार घेत याचिकाही दाखल करून घेत सुनावणीचे आदेश दिले होते. या रस्त्याच्या कामाला सुरवात करण्यात आली तेव्हा चौपदरीकरणाला मंजुरी नव्हती मात्र नेत्यांच्या रेट्याने या कामाचा आवाका वाढला होता. आवाका वाढला तरी या कामातील चौपदरीकरणाला आणि वाढीव निधीला मंजुरी मात्र मिळालेली नव्हती.

सोमवारी (ता. पाच) सायंकाळी जळगाव रस्त्याच्या कामाचा आढावा आणि पुढील विषयांवर चर्चा करण्यासाठी केंद्रीय रस्ते विकास मंत्रालयातर्फे बैठक घेण्यात आली. या बैठकीत रस्त्याच्या चौपदरीकरणाला औपचारिकरीत्या मंजुरी देण्यात आली. या कामासाठी मंजूर निधीमध्ये वीस टक्के वाढ करण्यावर केंद्रीय रस्ते विकास मंत्रालयाने मोहोर उमटवली. 267 कोटी किंमत असलेल्या या प्रकल्पासाठी आता 320.4 कोटींचा निधी खर्च केला जाणार आहे. या रस्त्याच्या कामाच्या अवधीबाबत विचारणा केली असता त्यासाठी अजून एक वर्षाचा कालावधी लागणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम (राष्ट्रीय महामार्ग) विभागाचे वरिष्ठ अधिकारी एल. एच. जोशी यांनी "सकाळ'ला दिली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 20 percent more funding for Aurangabad-Jalgaon road