हिंगोलीत सव्वा लाखाचा गुटखा जप्त

विनायक हेंद्रे
Thursday, 9 April 2020

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पिंपरी बुद्रुक येथे एका दुकानावर छापा मारून सव्वा लाख रुपये किमतीचा गुटका पकडला. रात्री उशिरापर्यंत याबाबत कारवाई सुरू होती. लॉकडाउन काळातही अवैध धंदे सुरू असल्याचे या कारवाईवरून समोर आले आहे.

आखाडा बाळापूर (जि. हिंगोली): येथील पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या पिंपरी बुद्रुक (ता. कळमनुरी) येथे एका दुकानातून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी (ता.नऊ) सुमारे एक लाख २१ हजार रुपये किमतीचा गुटखा जप्त केला आहे.

जिल्हाभरात जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सोडली तर इतर दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. मात्र, तरीही काहीजण जीवनावश्यक वस्तूंसह इतर साहित्यांची विक्री करत आहेत. सध्या गुटखा, दारू विक्रीही अनेकजण करत आहेत. या विरुद्ध पोलिस प्रशासन कारवाई करत आहे. त्यामुळे काही प्रमाणात जरब बसली आहे. 

हेही वाचावितरणापूर्वी रेशनच्या मालाची तपासणी करा : पालकमंत्री वर्षा गायकवाड

दुकानावर छापा टाकला

पिंपरी बुद्रुक येथे एका दुकानात गुटका असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्यावरून पोलिस अधीक्षक योगेश कुमार, अतिरिक्त पोलिस अधीक्षक यशवंत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक जगदीश भंडरवार, उपनिरीक्षक किशोर पोटे, शिवसांब घेवारे, जमादार संभाजी लेकुळे, बालाजी बोके, ज्ञानेश्वर सावळे यांच्या पथकाने गुरुवारी सायंकाळी पिंपरी बुद्रुक येथील दुकानावर छापा टाकला. 

गुटखा विक्रेते सरसावले

या वेळी पोलिसांना एक लाख २१ हजार रुपये किमतीचा गुटखा आढळून आला. या प्रकरणी सायंकाळी उशिरापर्यंत कारवाई करण्याचे काम सुरू होते. दरम्यान गुटखा विक्रेते सरसावले आहेत. गुटखा विक्रेत्यांविरुद्ध ठोस कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. 

४८ लिटर गावठी दारू पकडली

हिंगोली : हिंगोली शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या कमलानगर व हट्टा पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या आरळ येथे गुरुवारी (ता.नऊ) पोलिसांनी छापा टाकून ४८ लिटर गावठी दारू पकडून दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.

हट्टा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

हिंगोली शहर पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या कमलनगर भागातील संदीप खडसे हा गावठी दारू विक्री करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्‍यावरून पोलिसांनी छापा मारला असता एक हजार ६०० रुपये किमतीची आठ लिटर हातभट्टीची दारू आढळून आली. बालाजी बोके यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिस ठाण्यात संदीप खडसे याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. दुसरी कारवाई हट्टा पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या आरळ येथे करण्यात आली.

येथे क्लिक कराबॅंक खात्याची माहिती देताना काळजी घ्या : पोलिस अधीक्षक योगेशकुमार

 मोहफुलं व गुळाचे मिश्रण आढळले

 येथे चार हजार रुपये किमतीची ४० लिटर दारू तसेच मोहफुलं व गुळाचे मिश्रण आढळून आले. याप्रकरणी एस. एस. लेकुळे यांच्या फिर्यादीवरून एकावर गुन्हा दाखल झाला आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक योगेश कुमार, अतिरिक्त पोलिस अधीक्षक यशवंत काळे, पोलिस निरीक्षक जगदीश भंडरवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक शिवसांब घेवारे, किशोर पोटे, बालाजी बोके, संभाजी लेकुळे, सुनील अंभारे, भगवान आडे, राजूसिंग ठाकूर, किशोर कातकाडे, विशाल घोळवे, शंकर ठोंबरे, किशोर सावंत, दीपक पाटील, विठ्ठल काळे, आकाश टापरे यांच्या पथकाने केली आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 1 lakh Rupes of Ghutka Seized in Hingoli, Hingoli news