बॅंक खात्याची माहिती देताना काळजी घ्या : पोलिस अधीक्षक योगेशकुमार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

yogesh kumar

कर्जाचे हप्ते स्‍थगित करण्याच्या कारणावरून मोबाइल क्रमांकावर आलेले ओटीपी क्रमांक चोरटे विचारत आहेत. त्यानंतर ग्राहकांच्या खात्यात असलेली रक्‍कम काढून घेण्याचे प्रकार वाढत असून यासाठी नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन पोलिस अधीक्षक योगेश कुमार यांनी केले आहे.

बॅंक खात्याची माहिती देताना काळजी घ्या : पोलिस अधीक्षक योगेशकुमार

हिंगोली: चोरट्यांनी फसवणुकीची नवीन पद्धत शोधून काढली आहे. बँकेतून बोलत असल्याची बतावणी करून कर्जाचे हप्ते स्‍थगित करण्यासाठी मोबाइल क्रमांकावर आलेले ओटीपी क्रमांक विचारत आहेत. त्यानंतर ग्राहकांच्या खात्यात असलेली रक्‍कम काढून घेण्याचे प्रकार वाढत असून यासाठी नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन पोलिस अधीक्षक योगेश कुमार यांनी केले आहे.

कोरोना विषाणूमुळे देशभरात लॉकडाउन असल्याने नागरिक घरात बंदिस्‍त आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व उद्योगधंदे बंद आहेत. त्‍यामुळे नागरिकांनी बँकांकडून घेतलेले कर्जाचे हप्‍ते भरण्याची समस्या निर्माण झाली आहे. बॅंकांकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड कशी करावी, याची चिंता लागली आहे. 

हेही वाचासिनेस्टाइल पाठलाग करून पकडला दोन लाखांचा गुटखा

फसवणुकीची नवीन पद्धत

त्यामुळे सध्याची परिस्‍थिती लक्षात घेता तीन महिन्यांसाठी कर्जाचे हप्ते स्‍थगित करण्याची परवानगी रिझर्व बँक ऑफ इंडियाने काही दिवसांपूर्वी दिली आहे. या सुचनेनुसार सरकारी, खासगी व बिगर बँकीग वित्तीय सवलत द्यावयाची की नाही, या बाबत बॅंका निर्णय घेऊ शकतात. त्‍या अनुषंगाने चोरट्यांनी फसवणुकीची नवीन पद्धत शोधून काढली आहे.

बँकेतून बोलत असल्याची बतावणी

 ग्राहकांना त्‍यांचे मोबाइलवर फोन करून बँकेतून बोलत असल्याची बतावणी केली जात आहे. कर्जाचे हप्ते स्‍थगित करण्यासाठी त्‍यांचे मोबाइल क्रमांकावर आलेले ओटीपी विचारत आहेत. त्यानंतर ग्राहकांच्या खात्यामध्ये असलेली रक्‍कम काढून घेतली जात आहे. अशा घटना हिंगोली जिल्ह्यातही घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

संबंधित बॅंकेशी संपर्क साधावा

त्यामुळे खबदारी म्‍हणून अनोळखी नंबरवरून असे मॅसेज किंवा कॉल आल्यास त्‍यांनी विचारलेली माहिती भरू नये, अथवा सांगू नये. बँक कधीही फोनद्वारे ओटीपी किंवा बँक खातेशी संबंधित इतर गोपनीय माहिती विचारत नाही. कर्जाचे हप्ते बाबत काही अडचण असल्यास संबंधित बॅंकेशी संपर्क साधावा. तसेच गुगलवरून बँकेचा संपर्क क्रमांक घेतला असल्यास तो संबंधित बँकेचाच असल्याची खात्री करावी. 

येथे क्लिक कराबॅंक, पोस्टात एका वेळी चारच ग्राहकांना प्रवेश

फेक कॉल व मॅसेजपासून सावध राहावे

तसेच कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून जाहीर केलेल्या मदतीच्या अनुषंगाने जनधन खात्यात प्रत्‍येकी दोन हजार रुपये जमा करण्यासाठी बँकेतील खातेविषयी चोरटे माहिती विचारू शकतात. अशा फेक कॉल व मॅसेजपासून नागरिकांनी सावध राहावे, सोशल मीडियाच्या हालचालीवर सायबर सेल लक्ष ठेवून असून अधिक माहितीसाठी पोलिस नियंत्रण कक्षाकडे संपर्क साधण्याचे आवाहन पोलिस अधीक्षक योगेश कुमार यांनी केले आहे.

loading image
go to top