पोलिसांच्या मारहाणीत वृद्ध शेतकऱ्याचा मृत्यू

umarga
umarga

उमरगा : तालुक्यातील कराळी पाटीजवळ तीन दिवसापूर्वी झालेल्या कार अपघाताच्या दुर्घटनेनंतर तलमोड ग्रामस्थांनी पोलिस वाहन व अग्नीशमन गाडीवर केलेल्या दगडफेक प्रकरणी गुन्हा दाखल केलेल्या लोकांची गुरुवारी (ता. 25)  धरपकड करताना मारहाणीत एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी या ज्येष्ठ नागरिकाचा मृतदेह पहाटे पाचच्या सुमारास उमरगा पोलिस ठाण्यात आणला. दरम्यान पोलिसांची दडपशाही व मारहाणीत ज्येष्टाचा मृत्यू झाल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी संबंधित पोलिस उपनिरीक्षकासह कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिस ठाण्यात ठिय्या मांडला आहे. यामध्ये महिलाही मोठ्या संख्येने सहभागी झाल्या आहेत.

याबाबतची माहिती अशी की, रविवारी (ता. 21) दुपारी चारच्या सुमारास कराळी पाटीजवळ झालेल्या अपघातात कारने पेट घेतल्याने तिघांचा होरपळून मृत्यू झाला होता. या दुर्देवी घटनेदरम्यान पोलिस प्रशासन व अग्नीशमन गाडी वेळेत पोचली नसल्याने भावनेच्या भारात ग्रामस्थांनी पोलिसांच्या गाडीवर दगडफेक केली, अग्नीशमन गाडीचे मोठे नुकसान केले. या प्रकरणी पोलिस प्रशासनाने तलमोडच्या 20 ते 25 लोकांवर गुन्हे दाखल केले आहेत. या गुन्ह्याच्या अनुषंगाने आरोपींना अटक करण्यासाठी पोलिस उपनिरीक्षक सुभाष माने, हवालदार पी. डी. गवळी यांच्यासह सात ते आठ कर्मचारी गुरुवारी पहाटे दोनच्या सुमारास तलमोड गावात पोचले. मूकेश मोरे या तरुणाला ताब्यात घेताना त्याचे आजोबा दतु गणपती मोरे (वय 65) यांनी आमच्या पोरान काय केलयं, त्याला कशाला घेऊन जाता असे विचारले असता पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांना धक्काबुक्की करत मारहाण केली. त्यात त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप ग्रामस्थ व त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे.

दत्तु मोरे यांचा मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर मध्यरात्रीपासूनच गावं जागे झाला आणि पोलिसाच्या दडपशाहीच्या विरोधात एकत्र आला. पहाटे पाचच्या सुमारास दतु मोरे यांचा मृतदेह पोलिस ठाण्याच्या आवारातील कट्यावर ठेवला. पोलिसांच्या मारहाणीमुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप करत संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी ग्रामस्थांनी लावून धरली. या प्रकरणात खासदार प्रा. रविंद्र गायकवाड, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाबा पाटील, भारत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अश्लेष मोरे, जिल्हा परिषदेचे सदस्य प्रकाशा आष्टे, माजी सदस्य दिलीप भालेराव यांच्यासह तलमोडचे बालाजी मोरे, राहुल मोरे, दगडू पाटील, मल्लीनाथ स्वामी, अमर पाटील, राजेंद्र सुगीरे, नाना पाटील, धनराज मोरे, विलास मोरे, संतराम पाटील, राजेंद्र येवते, राजेंद्र जाधव, दतू जाधव, पवन स्वामी, विजय मोरे, यादव भोसले, अशोक मोरे, सुधाकर मोरे, विजय मोरे आदींनी पोलिस अधिकाऱ्यांशी चर्चा केली. या घटनेला जबाबदार असणाऱ्या पोलिस अधिकारी व संबंधित पोलिस कर्मचाऱ्यावर गुन्हे दाखल करण्यासाठी तक्रार देण्याची प्रक्रिया सुरू होती. सकाळी साडेआठपर्यंत ग्रामस्थ पोलिस ठाण्यात ठिय्या मांडून होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com